कचरा साठल्याने तुंबला नाला

By Admin | Updated: June 8, 2016 02:19 IST2016-06-08T02:19:09+5:302016-06-08T02:19:09+5:30

वाढती लोकसंख्या, शहरीकरण, प्लास्टिकचा वाढता वापर यामुळे मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या कचऱ्यामुळे वेगवेगळ्या समस्या व आजार निर्माण होत आहेत.

Tumbla Barrow due to rubbish | कचरा साठल्याने तुंबला नाला

कचरा साठल्याने तुंबला नाला


पाली : वाढती लोकसंख्या, शहरीकरण, प्लास्टिकचा वाढता वापर यामुळे मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या कचऱ्यामुळे वेगवेगळ्या समस्या व आजार निर्माण होत आहेत. यातच पाली येथील भोईआळीसमोर असलेल्या नाल्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
भोईआळीतील आजूबाजूची घरे, कार्यालये, दुकाने, भाजी मंडया, उपाहारगृह, रुग्णालय या सर्व ठिकाणाहून अनेक वेगवेगळ्या प्रकारचा कचरा रोजच्या रोज या नाल्यामध्ये टाकला जातो. यामुळे या नाल्याचे पाणी तुंबले आहे. हा नाला पालीतील आचार्य वाडा, जुनी स्टेट बँक, आगरआळी, भोईआळी येथून वाहत असतो. याच नाल्यातील पाणी हे पुढे जाऊन अंबा नदीला मिळते. अंबा नदीचे पाणी संपूर्ण पालीकरांना विनाशुध्दीकरण करता मिळते. यामुळे पालीकरांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. या नाल्यात टाकलेला कचरा हा रोजच्या रोज साफ न केल्याने हा कचरा कुजला आहे, त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना दुर्गंधीस सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीने हा कचरा रोजच्या रोज साफ करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
नाल्याशेजारी कचराकुंडी असावी, अशी मागणी आम्ही गेली कित्येक दिवस करीत आहोत. कचराकुंडी असल्यास ग्रामस्थ कचरा कुंडीत टाकतील व नाला तुंबणार नाही, परंतु ग्रामपंचायत आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.
- चंद्रकांत आंबेकर, माजी सदस्य, ग्रामपंचायत पाली
पावसाळ्यात तुंबणार नाला ?
या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका असून पाली ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. पावसाळ्यात या कचऱ्यामुळे नाला तुंबून मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
>नालेसफाईची मागणी
पालीतील नाले व गटारांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, बॉटल, माती आणि विविध प्रकारचा कचरा साठला आहे. वेळीच तो साफकरण्यात आला नाही तर पावसाचे पाणी नाल्यात व गटारात तुंबून पूरसदृश स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे लवकरात लवकर नालेसफाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Tumbla Barrow due to rubbish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.