तुकाराम मुंढेंनी स्वीकारला पीएमपीचा पदभार
By Admin | Updated: March 29, 2017 18:25 IST2017-03-29T18:25:39+5:302017-03-29T18:25:39+5:30
संचालकपद स्वीकारण्यास तुकाराम मुंढे तयार नसल्याच्या चर्चा सुरू असतानाच त्यांनी बुधवारी पदभार स्वीकारला.

तुकाराम मुंढेंनी स्वीकारला पीएमपीचा पदभार
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 29 - पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपद स्वीकारण्यास तुकाराम मुंढे तयार नसल्याच्या चर्चा सुरू असतानाच त्यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. कसलीही नाराजी नसल्याचे स्पष्ट करीत त्यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लगेचच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाला सुरुवातही केली.
राज्य शासनाने शुक्रवारी नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली केली. त्यानंतर रात्रीच सर्व सूत्रं हलली आणि शनिवारी मागील नऊ महिन्यांपासून रिक्त असलेल्या पीएमपीच्या अध्यक्षपदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, या नियुक्तीमुळे मुंढे नाराज असल्याची चर्चा सुरू झाल्या. पीएमपीमध्ये येण्यास ते अनुत्सुक आहेत. त्यांना पुणे पालिकेचे आयुक्तपद हवे असल्याची चर्चा रंगली होती. तर १ एप्रिल रोजी ते पदभार स्वीकारतील, असेही सांगितले जात होते. तसेच मंगळवारी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंढे यांच्या नाराजीवर बोलण्यास टाळले होते. त्यामुळे आणखी संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, मुंढे यांनी बुधवारी पीएमपीमध्ये येऊन या सर्व चर्चांना फोल ठरविले. सोमवारी मी नवी मुंबई पालिकेचा पदभार सोडला. मंगळवारी सुट्टी होती. त्यामुळे आज पदभार स्वीकारला आहे, असे सांगत त्यांनी वावड्या उडविणाऱ्यांना गप्प केले.
बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुंढे पीएमपीच्या स्वारगेट येथील मुख्यालयात दाखल झाले. पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे त्यांच्यासोबत होते. यावेळी पीएमपीतील कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये मुंढे यांच्याबद्दल मोठी उत्सुकता दिसून आली. त्यांना पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांची गर्दी झाली होती. मुंढे यांनी कार्यालयात जाऊन लगेचच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून कामाला सुरुवात केली. दरम्यान, मागील नऊ महिन्यांपासून पीएमपीच्या अध्यक्षपदी पुर्णवेळ अधिकारी नव्हता. पुणे पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला होता. अभिषेक कृष्णा यांची बदली झाल्यापासून हे पद रिक्त होते. त्यानंतर राज्य शासनाने धुळ्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांची नियुक्ती केली. मात्र, ते पुण्यात आलेच नाहीत. त्यामुळे प्रवासी संघटनांकडून सातत्याने पूर्णवेळ अधिकारी देण्याची मागणी केली जात होती. आता मुंढे यांच्यारूपाने पूर्णवेळ कार्यक्षम अधिकारी मिळाल्याने पीएमपीला लवकरच अच्छे दिन अशी आशा व्यक्त केली जात आहे.