नागपूरमध्ये 'पीके'चा खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न, थिएटरवर दगडफेक
By Admin | Updated: December 31, 2014 18:34 IST2014-12-31T18:31:30+5:302014-12-31T18:34:12+5:30
भाजपा युवा मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी नागपूरमधील संगम चित्रपटगृहावर दगडफेक करून 'पीके' चित्रपटाचा खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

नागपूरमध्ये 'पीके'चा खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न, थिएटरवर दगडफेक
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ३१ - भाजपा युवा मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी नागपूरमधील संगम चित्रपटगृहावर दगडफेक करून 'पीके' चित्रपटाचा खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा चित्रपट हिंदूविरोधी असल्याच्या भूमिकेवरून चित्रपटाविरोधात निदर्शने होत असतानाच नागपूरमध्ये हा प्रकार घडला आहे. बुधवारी संध्याकाळी चार-पाच तरूणांनी चित्रपटाविरोधात घोषणा देत 'संगम थिएटरच्या बूकिंग काऊंटरवर दगडफेक केली आणि ते तेथून पसार झाले.
विशेष म्हणजे चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिल्याने चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचा प्रश्नच नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेली असतानाही, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचे दिसत आहे. या चित्रपटासंदर्भात कोणतीही चौकशी होणार नाही. राज्यात चित्रपटाचे खेळ सुरूच राहतील, तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनात कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी आवश्यक संरक्षणही देण्यात येईल, असेही ते म्हणाले होते.
दरम्यान या चित्रपटाला देशात होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर 'या चित्रपटामुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता' असे दिग्दर्शक राजू हिरानी यांनी स्पष्ट केले. तसेच अभिनेता आमिर खाननेही आपण हिंदू धर्माविरुद्ध नसल्याचे सांगितले आहे.