जालन्यात संघ कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: November 23, 2014 02:14 IST2014-11-23T02:14:27+5:302014-11-23T02:14:27+5:30
जुना जालना भागातील टाऊन हॉल परिसरातील ‘केशरिया भवन’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हा कार्यालयास शनिवारी पहाटे अज्ञातांनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला.

जालन्यात संघ कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न
जालना : जुना जालना भागातील टाऊन हॉल परिसरातील ‘केशरिया भवन’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हा कार्यालयास शनिवारी पहाटे अज्ञातांनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतू कार्यालयात झोपलेल्या दोन कार्यकत्र्याच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.
मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्या सुमारास या कार्यालयाच्या दरवाजाला अज्ञातांनी ग्रीस लावले. त्यावर थोडेसे पेट्रोल ओतले आणि जळती काडी टाकून फरार झाले. आधी संपूर्ण दरवाजाने पेट घेतला. नंतर जवळच असलेल्या प्लास्टिकच्या पायपुसणीनेही पेट घेतल्याने कार्यालयात धूर पसरला. आत झोपलेले मेघालय येथील कार्यकर्ते एल.एम. संगमा आणि अंभूरे यांनी त्वरित संघाच्या प्रमुख कार्यकत्र्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. कार्यकर्ते आणि पोलिसांच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली़ त्यानंतर संपूर्ण शहरात नाकाबंदी केली. हा प्रकार समजातच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे घटनास्थळी दाखल झाले. आ. बबनराव लोणीकर, आ. नारायण कुचे, संघाचे जिल्हा संघचालक विनायकराव देहेडकर आदींनी घटनास्थळाला भेट दिली़ सिद्धीविनायक मुळे यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े (प्रतिनिधी)
चौकशीसाठी दोन पथके
या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. त्यासाठी दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी दिली.
हा तिसरा प्रकार
संघ कार्यालयावर यापूर्वी दोनदा असा अनुचित प्रकार घडला होता. एकदा कोणीतरी कुलूप तोडण्याचा तर दुस:यांदा काचा फोडल्या होत्या, अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली.