आयपीएस अधिकाऱ्याला उडविण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: June 30, 2014 00:37 IST2014-06-30T00:37:26+5:302014-06-30T00:37:26+5:30
वाळू चोरी करून जात असलेल्या एका ट्रकचा पाठलाग करीत असलेल्या प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी गौरव सिंह यांना पोलीस जीपसह उडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत सिंह आणि त्यांचे साथीदार

आयपीएस अधिकाऱ्याला उडविण्याचा प्रयत्न
पोलीसही हादरले : वाळू माफियांची दादागिरी
नागपूर : वाळू चोरी करून जात असलेल्या एका ट्रकचा पाठलाग करीत असलेल्या प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी गौरव सिंह यांना पोलीस जीपसह उडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत सिंह आणि त्यांचे साथीदार थोडक्यात बचावले. पारशिवनी येथील वलनी घाटावर शनिवारी रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे पोलीस विभागही हादरून गेला आहे.
कन्हान आणि खापरखेडा पोलीस ठाणे हे वाळू आणि कोळसा माफियांचे गड समजले जातात. लतीफ अन्सारी हा वाळू माफिया आहे. व्यावसायिक दुश्मनीतून त्याने २०१० मध्ये प्रतिस्पर्धी अनवर याची वलनी चौकात गोळी झाडून हत्या केली होती.
या घटनेनंतर अनवरच्या समर्थकांनी पोलिसांची धुलाई केली होती. वलनी चौकी आणि पोलीस वाहन पेटवून दिले होते. या घटनेनंतर पोलिसांनी काही दिवसांपर्यंत लतीफला नियंत्रणात ठेवले. परंतु नेत्यांचे संरक्षण असल्याने तो पुन्हा सक्रिय झाला.
लतीफला ग्रामीण राजकारणात सक्रिय असलेल्या एका आमदाराचा आश्रय आहे. हा आमदार गुन्हेगारांना आश्रय देण्यासाठी कुख्यात आहे. आमदारासह ग्रामपंचायतच्या निवडणुकीतही त्याने सक्रिय भूमिका बजावलेली आहे. त्याच्या इशाऱ्यावरूनच ग्रामीण पोलीस लतीफ आणि त्याच्या टोळीपुढे लाचार बनले आहे.
तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी लतीफला तडीपार केले होते. एप्रिल महिन्यात त्याने न्यायालयातून तडीपारीचे आदेश रद्द करवून आणले. तेव्हापासून तो पुन्हा वाळू चोरीत सक्रिय झाला. कन्हानमध्ये लतीफची टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी कारवाईची तयारी सुरू केली.
कन्हानचे वादातीत ठाणेदाराची बदली केली. लतीफ टोळीचा सफाया करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी गौरव सिंह यांना कन्हान ठाण्याची जबाबदारी सोपविली. शनिवारी रात्री पोलिसांना वलनी घाटावरून लतीफ टोळीतर्फे वाळूची चोरी केली जात असल्याची माहिती मिळाली. या आधारावर चोरांना रंगे हात पकडण्याची योजना आखण्यात आली.
प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी गौरव सिंह आपल्या सहकाऱ्यांसह जीपने घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी रेतीसह ट्रकचालक पळून जात होता. त्याचा पाठलागत करताना ट्रक चालकाने त्यांना जीपसह उडविण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)