पोलिसाला ठार मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 06:19 IST2016-09-08T06:19:20+5:302016-09-08T06:19:20+5:30

पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांमुळे कायद्याचे रक्षकच असुरक्षित असल्याचे चित्र निर्माण होत असून कल्याणमध्ये दीड दिवसाच्या गणपती विसर्जनावेळी

Try to kill the police | पोलिसाला ठार मारण्याचा प्रयत्न

पोलिसाला ठार मारण्याचा प्रयत्न

कल्याण : पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांमुळे कायद्याचे रक्षकच असुरक्षित असल्याचे चित्र निर्माण होत असून कल्याणमध्ये दीड दिवसाच्या गणपती विसर्जनावेळी मोठ्या आवाजात वाद्य वाजवण्यावरून जरीमरी मित्र मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांच्यात झालेल्या वादातून कार्यकर्त्यांनी डगळे यांना विसर्जन तलावाच्या पाण्यात बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा भयंकर प्रकार उघड झाला आहे. सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला. मात्र, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंडळाच्या चार कार्यकर्त्यांना अटक झाली.
कर्कश्श आवाजात वाद्य वाजवून हुल्लडबाजी करणाऱ्या ‘जरीमरी मित्र मंडळा’च्या कार्यकर्त्यांना आपण हटकल्याने त्यांनी विसर्जन तलावाच्या पाण्यात आपल्याला बुडवून मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक डगळे यांनी ‘लोकमत’कडे केला. या प्रकरणातील प्रमुख आरोपी राहुल विश्वनाथ गायकवाड (२०) याला कल्याणमधून, तर बिन्देश दत्ता गायकवाड (२१), नयन दिलीप गायकवाड (२२) व नरेश महादू गायकवाड (३२) यांना माणेरे गावातून पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली आहे, अशी माहिती तपास अधिकारी संजू जॉन यांनी दिली. कल्याण पूर्व येथील जरीमरी तलावात दरवर्षीप्रमाणे दीड दिवसाच्या गणपतीचे मंगळवारी विसर्जन सुरू होते. त्या वेळी कार्यकर्ते आणि डगळे यांच्यात रात्री १० च्या सुमारास वाद झाला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन बंद केले. विसर्जन तलावाच्या ठिकाणी आजूबाजूच्या नागरिकांची मोठी गर्दी जमली. या गर्दी-गोंधळात एखाद्या गणेशमूर्तीला धक्का लागला, तर घटनेला वेगळेच वळण लागेल, हे ओळखून डगळे स्वत: पाण्यात उतरून गणपती विसर्जन करू लागले. हे पाहून जरीमरी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे पित्त खवळले. त्यापैकी राहुल गायकवाड याने तलावात उडी घेऊन गणपती विसर्जन करणाऱ्या डगळे यांना रोखण्याचा व त्यांचे डोके पाण्यात बुडवू त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. डगळे यांनी कसाबसा आपला जीव वाचवून पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जरीमरीच्या अन्य ३ कार्यकर्त्यांनी डगळे यांच्याशी हुज्जत घातली. कायद्याच्या रक्षकांवरील जीवघेण्या हल्ल्याचा हा दुर्दैवी प्रकार इतर हवालदार व पोलीस कर्मचाऱ्यांनी मोबाइलमध्ये कैद करून आपल्या वरिष्ठांना कळवला. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होताच राहुल व त्याच्या अन्य ३ साथीदारांनी तेथून पळ काढला.
महाराष्ट्रात ठिकठिकाणी पोलिसांवर हल्ले होत असतानाच डगळे यांच्यावरील हल्ल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी रात्री पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती घेतली. डगळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चार जणांवर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. जरीमरी मित्र मंडळाने मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांवर झालेले आरोप चुकीचे असल्याचा दावा केला आहे.
—————————————-

————————————————-
पोलिसांवरील हल्ल्याच्या ठळक घटना
नरसिंग महापुरे (४५) नौपाडा वाहतूक शाखेचे हवालदार यांना तीनहातनाका येथे योगेश भांबरे (२९) या मद्यपी वाहनचालकाने गाडीने उडवले व फरफटत नेले.
................
शशिकांत कालगुडे या शिवसेना शाखाप्रमुखाकडून वाहतूक शाखेच्या महिला हवालदाराला भररस्त्यात मारहाण व विनयभंग.
................
आबासाहेब थोरात या वाहतूक शाखेच्या हवालदाराच्या अंगावर खारेगाव टोलनाका येथे ट्रक नेऊन चिरडले
..................
विश्वास वालावलकर, नंदकुमार पाटील आणि कैलास बास्ते या तीन हवालदारांवर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींनी विटा फेकून त्यांना जखमी केले
.................
भिवंडीत बाबासाहेब बोराडे व अरुण बर्वे या दोन बीटमार्शलवर घरफोडी करणाऱ्या आरोपींनी चाकूहल्ला केला.
................
भिवंडी येथील दंगलीत गांगुर्डे व जगताप या दोन पोलीस हवालदारांना दंगेखोरांनी जिवंत जाळले.

Web Title: Try to kill the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.