सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न करा
By Admin | Updated: November 13, 2014 00:53 IST2014-11-13T00:53:46+5:302014-11-13T00:53:46+5:30
सिंचन प्रकल्पातील उपलब्ध जलसाठ्यातून जास्तीतजास्त सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर द्या,असे निर्देश जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न करा
प्रधान सचिवांकडून आढावा : अधिकाऱ्यांना निर्देश
नागपूर : सिंचन प्रकल्पातील उपलब्ध जलसाठ्यातून जास्तीतजास्त सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर द्या,असे निर्देश जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात बुधवारी गोसेखुर्द आणि निम्न वर्धा प्रकल्पाच्या कामाचा आढावा मालिनी शंकर यांनी घेतला. बैठकीला विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, भंडाऱ्याच्या जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, वर्धेचे जिल्हाधिकारी एन.नवीन सोना, विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाचे कार्यकारी संचालक शुक्ला, महसूल उपायुक्त राजलक्ष्मी शहा उपस्थित होते.
पूर्व विदर्भात सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी गोसेखुर्द आणि निम्न वर्धा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि प्रकल्पाचे बांधकाम वेळेत पूर्ण होईल, यादृष्टीने अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे; तसेच शासनाकडून प्राप्त निधी वेळेत खर्च होईल याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही मालिनी शंकर यांनी दिल्या. शेतीसाठी पाणी सोडताना प्रकल्पातील जलसाठा आणि पाऊस याचे वेळापत्रक याबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी व त्यासाठी संपर्क यंत्रणा अद्ययावत करावी, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
गोसेखुर्दचे काम पूर्ण
गोसेखुर्द प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यात पूर्णपणे पाणी साठवणूक करता येईल, असे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी यावेळी सांगितले. प्रकल्पाची सिंचन क्षमता २,५०,८०० हेक्टर आहे तर, पाणी साठवणूक क्षमता ४४.७० टीएमसी एवढी आहे. धरणासाठी भूसंपादनाचे आणि पुनर्वसनाचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे, असे अनुप कुमार म्हणाले.
६४१ कोटींचे वाटप
पर्यायी शेतजमिनीऐवजी रोख रक्कम, पुनर्वसन, गुरांचा गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत, नोकरीऐवजी एकमुस्त रक्कम आणि इतरही कामासाठी ११९९ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज शासनाने जाहीर केले होते. बुधवारच्या बैठकीत पॅकेजचाही आढावा घेण्यात आला. प्राप्त रकमेतून ६४१ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)