शिर्डीतील साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर
By Admin | Updated: July 30, 2016 03:52 IST2016-07-30T03:52:07+5:302016-07-30T03:52:07+5:30
तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनाने साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ शुक्रवारी जाहीर केले़ अध्यक्षपदी नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे तर उपाध्यक्षपदी

शिर्डीतील साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर
शिर्डी : तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनाने साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ शुक्रवारी जाहीर केले़ अध्यक्षपदी नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे तर उपाध्यक्षपदी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ याशिवाय १२ जणांची विश्वस्त म्हणून नियुक्ती झाली आाहे.
विश्वस्त मंडळात डॉ़ मनीषा श्यामसुंदर कायंदे, सचिन भागवत तांबे, अॅड़ मोहन मोतीलाल जयकर, प्रताप सखाहारी भोसले, डॉ़ राजेंद्र राजाबली सिंग, माजी खासदार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे, बिपीन शंकरराव कोल्हे, रवींद्र गजानन मिर्लेकर, अमोल गजानन कीर्तिकर व पदसिद्ध असलेल्या शिर्डीच्या नगराध्यक्षा अनिता विजय जगताप यांचा समावेश आहे़
स्थानिक आमदार राधाकृष्ण विखे यांचा विश्वस्तांत समावेश नसल्याने त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. विश्वस्त मंडळात शिवसेनेला उपाध्यक्षपद देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता़ तो न पाळल्याने आम्ही बाहेर पडणार असल्याचा गर्भित इशारा शिवसेनेचे नवनियुक्त विश्वस्त रवींद्र मिर्लेकर यांनी दिला आहे़ (तालुका प्रतिनिधी)
पाच जागा रिक्त
राज्य सरकारने आज केवळ १२ जणांचे विश्वस्त मंडळ जाहीर केले आहे़ अद्याप पाच जागा रिक्त असून मंत्रिमंडळ विस्ताराप्रमाणे यथावकाश व सोयीप्रमाणे संस्थानच्या मंडळाच्या विस्ताराचाही पायंडा पडण्याची चिन्हे आहेत़