घरात घुसला ट्रक
By Admin | Updated: August 12, 2014 01:16 IST2014-08-12T01:16:10+5:302014-08-12T01:16:10+5:30
पूर्व नागपुरातील खरबी रिंग रोडवर एक अनियंत्रित ट्रक (टिप्पर) घरात घुसल्याने दोन बहिणी गंभीर जखमी झाल्या. ही घटना सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. लीना उदाराम पाठराबे

घरात घुसला ट्रक
खरबी रिंग रोडवर अनर्थ टळला : दोन बहिणी गंभीर
नागपूर : पूर्व नागपुरातील खरबी रिंग रोडवर एक अनियंत्रित ट्रक (टिप्पर) घरात घुसल्याने दोन बहिणी गंभीर जखमी झाल्या. ही घटना सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. लीना उदाराम पाठराबे (२४) आणि मंजुषा पाठराबे (२५) अशी जखमी बहिणींची नावे आहेत.
६५ वर्षीय उदाराम पाठराबे यांचे खरबी रिंग रोडवरील आॅरेंजनगर येथे प्लॉट आहे. या प्लॉटच्या एका बाजूला पाठराबे यांचे टिनाचे शेड असलेले घर आहे. पाठराबे यांचा मुलगा पंकज मुंबईमध्ये अभियंता आहे. त्यांची पत्नी चंद्रकला काही दिवसांपूर्वीच मुंबईला मुलाकडे गेली. घरी उदाराम आणि त्यांच्या दोन मुली होत्या. सोमवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास एम.एच./३०/एल/४८९९ क्रमांकाचा ट्रक खरबी चौकाकडून हनुमान चौकाच्या दिशेने जात होता.
अचानक ट्रक अनियंत्रित होऊन रोड डिवायडरला तोडून उजव्या बाजूला वळला. रिंग रोडच्या उजव्या बाजूला पाठराबे यांचे घर होते. घराची सुरक्षा भिंत तोडून ट्रक थेट पाठराबे यांच्या घरात शिरला. घराच्या समोरच्या बाजूला त्यांच्या दोन्ही मुली झोपल्या होत्या. ट्रक भिंत तोडून आत शिरताच भिंतीचा मलबा लीना व मंजुषाच्या अंगावर पडला. पाठराबे आतील खोलीत होते.
जोराच्या आवाजासह मलबा अंगावर पडल्याने तिघेही घाबरून गेले. आवाज ऐकून शेजारीही मदतीसाठी धावले. त्यांनी लीना व मंजुषाला तात्काळ जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. ट्रक चालकही भीतीने पळून गेला. नागरिकांनी पोलिसांना सूचना दिली.
अपघात इतका भयानक होता की, घरातील कुणी जिवंत असेल असे कुणालाच वाटले नाही. ट्रकच्या रूपात दोन्ही बहिणींचा मृत्यू केवळ एका पावलावर होता. ट्रक आणखी पुढे गेला असता तर दोन्ही बहिणी आणि वडील वाचण्याची शक्यता नव्हती. ट्रकचालक दारूच्या नशेत असल्याची किंवा तांत्रिक बिघाडामुळे ट्रक अनियंत्रित झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मंजुषाचे नुकतेच लग्न ठरले आहे. ती घरी ट्युशन क्लास चालविते. लीना एलएलएम करीत आहे. अपघातात घरातील सर्व सामान क्षतिग्रस्त झाले आहे. दोन्ही बहिणींचे कॉम्प्युटर आणि अभ्यासाचे साहित्यसुद्धा नष्ट झाले आहे. जवळपास पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)
...तर मोठा अनर्थ झाला असता
पाठराबे यांच्या प्लॉटच्या समोरून अति उच्च दाबाची वीज लाईन गेली आहे. ट्रक विद्युत पोलच्या बाजूनेच घरात शिरला. जर ट्रक पोलवर आदळला असता विजेच्या तारा तुटल्या असत्या आणि मोठा अनर्थ झाला असता.