‘ट्रिपल आयटी’च्या जागेचे ग्रहण सुटणार

By Admin | Updated: July 16, 2014 01:15 IST2014-07-16T01:15:06+5:302014-07-16T01:15:06+5:30

दीड वर्षांपूर्वी घोषित झालेल्या ‘ट्रिपल आयटी’च्या (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी)जागेला लागलेले ग्रहण लवकरच सुटण्याची चिन्हे दिसून येत आहे. उपराजधानीच्या विद्यार्थ्यांसाठी

Triple IT will be eclipsed | ‘ट्रिपल आयटी’च्या जागेचे ग्रहण सुटणार

‘ट्रिपल आयटी’च्या जागेचे ग्रहण सुटणार

वर्धा मार्गावर १०० एकर जागेचा शोध : या आठवड्यात येणार केंद्र शासनाचे पथक
नागपूर : दीड वर्षांपूर्वी घोषित झालेल्या ‘ट्रिपल आयटी’च्या (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी)जागेला लागलेले ग्रहण लवकरच सुटण्याची चिन्हे दिसून येत आहे. उपराजधानीच्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकणाऱ्या या संस्थेसाठी आतापर्यंत दोन जागांना नकार मिळाला आहे. परंतु वर्धा मार्गावरील पांजरी येथील जागा ही सर्वतऱ्हेने योग्य असल्याचे तज्ज्ञांचे मत असून, या जागेलाच मान्यता मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या जागेची पाहणी करण्यासाठी याच आठवड्यात केंद्र शासनाची चमू येणार असल्याची माहिती ‘डीटीई’कडून (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) देण्यात आली आहे.
विदर्भातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षणाची संधी मिळावी, याकरिता राज्य शासनाने २०१२ साली नागपूरमध्ये ‘ट्रिपल आयटी’स्थापन करण्याची घोषणा केली. परंतु दीड वर्षांनंतर स्थापना प्रक्रियेच्या गाडीने अजूनही वेग घेतलेला नाही. ‘ट्रिपल आयटी’ नेमके कुठे उभारण्यात येईल, याबद्दल अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही.
केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन व उद्योगजगतातील मोठ्या कंपन्यांच्या सहकार्यातून ‘ट्रिपल आयटी’ उभारण्यात येणार आहे. यात केंद्राचा वाटा सर्वात जास्त असणार आहे. परंतु जागा देण्याची जबाबदारी ही राज्य शासनाकडे आहे. ‘ट्रिपल आयटी’साठी जवळपास ५० एकर जागेची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने याअगोदर नागपुरातील दोन जागांची पाहणी केली होती.
यात वर्धा रोड येथील कालडोंगरी येथील १०० एकर जागा व चिंचोली येथील ४० एकर जागेचा यात समावेश होता. परंतु कें द्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या पथकाने ही दोन्ही ठिकाणे अयोग्य असल्याचा निर्वाळा देत, या जागांना नकार दिला होता.
त्यानंतर वर्धा मार्गावरीलच पांजरी येथील जागा जवळपास १०० एकरच्या जागेचा शोध घेण्यात आला आहे. ही जागा मुख्य रस्त्याजवळच असून ‘ट्रिपल आयटी’साठी योग्य ठिकाण आहे. यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाने पाठविलेल्या प्रस्तावानुसार या जागेची पाहणी व अभ्यास करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाचे पथक या आठवड्यात येणार आहे. या पथकाने पाहणी केल्यानंतर अंतिम जागेसंदर्भात निर्णय होऊ शकेल, अशी माहिती ‘डीटीई’चे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी दिली.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची जागा अडली कुठे?
दरम्यान, उपराजधानीत येणाऱ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची जागा अंतिम झाली असली तरी, याचा ताबा अद्याप ‘डीटीई’कडे आलेला नाही. आॅटोमोटिव्ह चौकाजवळील या जागेचा दर २०१२ साली सुमारे २० कोटी ६० लाख रुपये होता. या जागेच्या दरासंदर्भात नगरविकास खात्याची अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
ही मंजुरी मिळाल्यावर या जागेसंदर्भात पुढील प्रक्रिया करता येईल, असे ठाकरे यांनी सांगितले. २०१५-१६ या वर्षात हे महाविद्यालय सुरू करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Triple IT will be eclipsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.