त्र्यंबकेश्वरचा ‘मार्ग’च खडतर!
By Admin | Updated: April 8, 2015 01:32 IST2015-04-08T01:32:20+5:302015-04-08T01:32:20+5:30
त्र्यंबकेश्वरसाठीच्या नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी टाकण्यात आलेल्या पाइपलाइनमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची चाळणी झाली आहे.

त्र्यंबकेश्वरचा ‘मार्ग’च खडतर!
नाशिक : त्र्यंबकेश्वरसाठीच्या नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी टाकण्यात आलेल्या पाइपलाइनमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची चाळणी झाली आहे. रस्त्यांच्या कॉँक्रिटीकरणाच्या कामामुळे शहरांतर्र्र्गत दळणवळण ठप्प झाले आहे.
जागोजागी खणून ठेवलेले रस्ते, अंथरूण ठेवलेल्या लोखंडी जाळ्या, नवीन व जुन्या रस्त्यांवरून धावताना वाहनचालकांची होणारी कसरत व विशेष म्हणजे या कामाची गुणवत्ता व मुदतीत काम पूर्ण होण्याविषयी त्र्यंबकवासीयांना शंका आहे. तीन महिन्यांपासून नगरपालिकेने अंतर्गत रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण सुरू केले आहे. सुमारे १४ कोटी रुपये खर्च करून लहान-मोठी ५२ रस्त्यांची कामे सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू आहेत. मात्र त्यामुळे शहरात सर्वत्र मातीचे ढीग, जागोजागी उघड्या पडलेल्या गटारी व त्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रशासकीय यंत्रणेने सिंहस्थ कामाचा आराखडा तयार केल्यानंतर राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात ३० कोटी रुपये दिलेले असतानाही निव्वळ नगरपालिकेतील राजकारणामुळे रस्त्यांची कामे मुदतीत होऊ शकली नाहीत. ज्या ज्या वेळी रस्त्यांच्या कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन तत्कालीन नगराध्यक्षांनी केले, त्या त्या वेळी अन्य नगरसेवकांनी बैठकांवर अघोषित बहिष्कार तहकुबीचा सपाटा लावल्याने कामे मंजूर झाली नाहीत. सत्तांतरानंतर मात्र कामांच्या निविदा काढल्या. (प्रतिनिधी)