ट्रेकला जाताय? जरा जपून..!
By Admin | Updated: July 5, 2016 02:02 IST2016-07-05T02:02:52+5:302016-07-05T02:02:52+5:30
पावसाळा सुरू झाल्यापासून तरुणाईला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील ट्रेकच्या आनंदाचे वेध लागले आहेत. परंतु आठवडाभरापूर्वी माथेरानचा डोंगर चढताना एक तरुण दरीत कोसळला.

ट्रेकला जाताय? जरा जपून..!
- कांता हाबळे, नेरळ
पावसाळा सुरू झाल्यापासून तरुणाईला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील ट्रेकच्या आनंदाचे वेध लागले आहेत. परंतु आठवडाभरापूर्वी माथेरानचा डोंगर चढताना एक तरुण दरीत कोसळला.
या घटनेने उत्साही तरुणांना धोक्याचा कंदील दाखवला आहे. याचा अर्थ पावसाळा संपेपर्यंत सहलीला जाऊ नये असा नाही; मात्र आनंद लुटण्याच्या भरात संकट ओढवून न घेण्याची खबरदारी तरुणांनी घेणे महत्त्वाचे आहे.
माथेरानच्या डोंगरावर ट्रेक करण्यासाठी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण आदी ठिकाणांहून तरुण मोठ्या प्रमाणात येत असतात. आठवडाभरापूर्वी डोंबिवली येथील १८ वर्षीय कॉलेज तरुण नेरळ येथून विकटगड येथे ट्रेकिंगसाठी आला होता. ट्रेकसाठी निघाल्यानंतर तो तरुण पावसाच्या पाण्यामुळे निसरड्या झालेल्या डोंगरावरून चढताना खाली कोसळून जखमी झाला.
मात्र वेळेत उपचार न मिळाल्याने या तरुणाला आपले प्राण गमवावे लागले. हा तरुण आपल्या मोठ्या भावासह अन्य पाच मित्रांसोबत नेरळ येथे आला होता. त्यांना ट्रेकिंग करीत माथेरानच्या डोंगर रांगात असलेल्या विकटगड येथे जायचे होते. त्यांनी प्रवास सुरू करताना सोपा मार्ग न निवडता जंगलातून पेब किल्ल्याकडे ट्रेकिंग करीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नेरळजवळील आनंदवाडी येथून असलेल्या जंगलातील रस्त्याने पेब किल्ल्याकडे कूच केली. त्या वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने हा प्रकार घडला. त्यामुळे ट्रेक करताना स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात ट्रेक करताना बऱ्याचदा झाडेझुडपे वाढली असल्याने रस्ता चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वांनी एकत्रित चालले तर बाकीच्या मित्रांना त्यांची साथ
मिळते. तसेच उंच डोंगर व कपाऱ्यावर चढून सेल्फी काढण्याचे धाडस करणे चुकीचे आहे कारण सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून तोल जाण्याची शक्यता असते.
ट्रेक सुरू करण्यापूर्वी येथील परिसराची संपूर्ण माहिती स्थानिकांकडून जाणून घेणे
तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे धोका टळू शकतो. त्यामुळे ट्रेकसाठी येणाऱ्या तरुणांनी तसेच पर्यटकांनी
ट्रेक करताना कोणतीही दुर्घटना होऊ नये अशी सावधगिरी बाळगून
ट्रेक करावे व ट्रेक करताना स्थानिकांकडून परिसराची माहिती घेऊनच पुढे वाटचाल करावी.
हे करणे टाळा
- कानात हेडफोन घालू नये. मागून कोण आवाज देत असेल तर आवाज येत नाही
- ट्रेक करताना धूम्रपान व मद्यपान करू नये.
- उंच डोंगरकपाऱ्यांवर चढून सेल्फी काढणे टाळणे
- निसर्गसंपदेला धोका पोहचू नये याची विशेष काळजी घेणे
- मदत म्हणून स्थानिकांचे मोबाइल नंबर जवळ असणे गरजेचे.
ट्रेकसाठी आवश्यक साहित्य : सॅक, शूज, खाण्याचे पदार्थ, बॅटरी, आवश्यक औषधे, पाण्याची बाटली, पाण्यामुळे साहित्य भिजू नये यासाठी प्लॅस्टिक पिशवी.