आव्हाडांना धोबीपछाड देण्यासाठी सेनेची चाल
By Admin | Updated: August 2, 2014 03:03 IST2014-08-02T03:03:56+5:302014-08-02T03:03:56+5:30
मुस्लिमांच्या विरोधात नेहमीच आग ओकणाऱ्या शिवसेनेने इत्तेहाद-ए-मजलीस मुस्लीम या पक्षाचे नेते अकबरउद्दीन ओवेसी यांनी मुंब्य्रात इफ्तारसाठी हजेरी लावली असता त्याविरोधात ‘ब्र’ही काढला नाही.

आव्हाडांना धोबीपछाड देण्यासाठी सेनेची चाल
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून ठाणे शहरात शिवसेनेने एकीकडे काँगे्रसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे समर्थक नगरसेवक रवींद्र फाटक यांच्यासह सात नगरसेवकांना आपल्या तंबूत खेचले असताना दुसरीकडे मुंब्य्रातून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना धोबीपछाड देण्यासाठी त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांच्या मदतीने बुरख्याआडून ‘डाव’ खरे करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत़
याचाच भाग म्हणून मुस्लिमांच्या विरोधात नेहमीच आग ओकणाऱ्या शिवसेनेने इत्तेहाद-ए-मजलीस मुस्लीम या पक्षाचे नेते अकबरउद्दीन ओवेसी यांनी मुंब्य्रात इफ्तारसाठी हजेरी लावली असता त्याविरोधात ‘ब्र’ही काढला नाही. तिकडे नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात एका मुस्लीम बांधवाचा रोजा तोडणारे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचा देशभरातून धिक्कार होत असताना मुंब्य्रातील ओवेसी समर्थकांनी व अन्य मुस्लिमांनी त्यांचा निषेध न करता मौन पाळणे पसंत केले आहे़ या दोन्ही घटना ठाण्यासह कळवा-मुंब्रा मतदारसंघांत आगामी राजकीय वातावरण कसे राहील, याचा प्रत्यय देणाऱ्या आहेत़
एरव्ही, ऊठसूट या ना त्या थातूरमातूर कारणावरून निषेधासाठी रस्त्यावर उतरणारी शिवसेना अन् धार्मिक भावना दुखावल्यानंतर नको तेवढा कांगावा करणाऱ्या
मुस्लीम बांधवांनी ठाण्यातील स्वत:ला मीच खरा राष्ट्रवादी नेता व मुस्लिमांचा तारणहार, असा डांगोरा पिटणाऱ्या राष्ट्रवादी नेत्यांचे ‘डाव’ खरे करण्यासाठी घेतलेल्या या संयमी भूमिकेकडे जिल्ह्यातील राजकीय निरीक्षक बुरख्याआडचे राजकारण असे वर्णन करीत आहेत. राष्ट्रवादीमुक्त ठाणे करण्यासाठी शिवसेनेने त्या पक्षाचे शहरातील एकमेव आमदार असलेल्या जितेंद्र आव्हाड यांना धोबीपछाड देण्यासाठी हे राजकारण खेळल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)