आदिवासींना हवे स्वतंत्र राज्य - पिचड
By Admin | Updated: February 14, 2015 04:10 IST2015-02-14T04:10:26+5:302015-02-14T04:10:26+5:30
देशभरात अठरा कोटी संख्या असलेला आदिवासी समाज आजही विकासापासून वंचित असून, स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय विकास होणे शक्य नाही़

आदिवासींना हवे स्वतंत्र राज्य - पिचड
नाशिक : देशभरात अठरा कोटी संख्या असलेला आदिवासी समाज आजही विकासापासून वंचित असून, स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय विकास होणे शक्य नाही़ केंद्र सरकारने आदिवासींसाठी स्वतंत्र राज्याची निर्मिती करण्याची मागणी माजी मंत्री मधुकर पिचड यांनी शुक्रवारी येथे केली़
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे कालिदास कलामंदिरात आयोजित प्रबोधन मेळाव्यात ते बोलत होते़ थोर स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांना भारतरत्न देण्याची तसेच स्वतंत्र राज्याची निर्मिती न केल्यास देशभर आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला़
व्यासपीठावर आमदार वैभव पिचड, राष्ट्रीय महिला अध्यक्ष ऊर्मीताई मार्को, मणिरामजी मडवी, नामदेव मेश्राम, आऱ यू़ केराम, धनश्याम मडवी, दशरथ मडवी, श्याम वरखडे, सूर्यकांत उईके, नारायण सिडम आदि उपस्थित होते़
पिचड म्हणाले की, आदिवासी ही महान संस्कृती असून, तेच या देशाचे मूळ आहेत़ देशाच्या स्वातंत्र्यासाठी उठाव करून बलिदान देणारा हा समाज असून, दुर्दैवाने या समाजाचा इतिहास लिहिणारे कुणी नव्हते़ या समाजावर सतत अन्याय-अत्याचार होत गेले तसेच त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले़ आश्रमशाळा, वसतिगृहे यातील विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसून याविरोधात लढाई करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढे येण्याची आवश्यकता आहे़
मंत्रिपदाच्या काळात पेसा कायदा मंजूर केला; मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने आंदोलनाची वेळ आली आहे़ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठीच्या वक्तव्याचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला़ तसेच या आरक्षणाबाबत चुकीचा निर्णय घेतल्यास मुंबईकडे जाणारे पाणी अडविण्याचा इशारा त्यांनी
दिला़ (प्रतिनिधी)