तिहेरी हत्याकांडातील आरोपीचा मेडिकलमध्ये मृत्यू
By Admin | Updated: October 23, 2016 15:34 IST2016-10-23T15:34:29+5:302016-10-23T15:34:29+5:30
तुमसर येथील बहुचर्चित तिहेरी हत्याकांडातील आरोपीचा मेडिकलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तिहेरी हत्याकांडातील आरोपीचा मेडिकलमध्ये मृत्यू
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 23 - तुमसर येथील बहुचर्चित तिहेरी हत्याकांडातील आरोपीचा मेडिकलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. इमदाद अली वाहिद अली सय्यद (वय ५४) असे मृत कैद्याचे नाव असून तो विविध व्याधींनी त्रस्त होता. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी पोलिसांकडे वर्तविला आहे.
इमदाद भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील मातानगरात राहत होता. संशयी आणि सणकी स्वभावाच्या इमदादने २ एप्रिल २०१४ ला सासू, पत्नी आणि स्वत:च्या मुलीची निर्घृण हत्या केली होती. या तिहेरी हत्याकांडाने भंडारा जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडवली होती. भक्कम साक्षीपुराव्याच्या आधारे कोर्टाने इमदादला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती.
डिसेंबर २०१५ पासून तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होता. त्याला मधूमेह, उच्च रक्तदाब आणि अस्थमाचा आजार जडला होता. त्यामुळे त्याची प्रकृती नेहमीच कमी जास्त होत होती. शुक्रवारी रात्री त्याची प्रकृती खालावल्याने त्याच्यावर कारागृहातील रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती जास्तच बिघडल्याने त्याला कारागृह प्रशासनाने मेडिकलमध्ये भरती केले. तेथील डॉक्टरांनी शुक्रवारी रात्री ११.१५ वाजता इमदादला मृत घोषित केले. कारागृह रक्षक राकेश रामदास वांढरे यांनी दिलेल्या माहितीवरून धंतोलीच्या पोलीस उपनिरीक्षक नम्रता जाधव यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.