याकूब मेमनच्या फाशीची नागपूर कारागृहात ट्रायल
By Admin | Updated: July 17, 2015 23:52 IST2015-07-17T23:52:48+5:302015-07-17T23:52:48+5:30
मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला मृत्युदंड देणाऱ्या ‘टीम येरवडा’कडे याकूब मेमनच्या मृत्युदंडाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. खास सूत्रांच्या माहितीनुसार

याकूब मेमनच्या फाशीची नागपूर कारागृहात ट्रायल
- नरेश डोंगरे, नागपूर
मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला मृत्युदंड देणाऱ्या ‘टीम येरवडा’कडे याकूब मेमनच्या मृत्युदंडाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. खास सूत्रांच्या माहितीनुसार, ही टीम नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात तयारीला लागली असून, फाशी यार्डात ट्रायलही सुरू झाली आहे.
कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारानंतरचे दार ओलांडल्यानंतर डाव्या बाजूला (उत्तर दिशेला) साधारणत: २०० फूट अंतरावर फाशी यार्ड आहे. याकूबला फाशी देण्यापूर्वीची प्रक्रिया काळजीपूर्वक आणि विलक्षण गोपनीयता बाळगून राबविली जात असून, येथील सिमेंटच्या चौथऱ्याची २९ वर्षांनंतर पहिल्यांदाच डागडुजी करण्यात आली आहे. कारागृह अधीक्षक योगेश देसाई यांच्याकडे विचारणा केली असता, याकूबसंदर्भात आपल्याला काहीही बोलायचे नाही, असे ते सांगतात.
दोन वर्षांपूर्वी येरवडा कारागृहात अधीक्षक असताना देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी कसाबला फासावर लटकवले होते. हीच टीम काही दिवसांपूर्वी येथील मध्यवर्ती कारागृहात बदलीवर आली आहे. १५ ते १७ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या या चमूने ‘ट्रायल’ही सुरू केली आहे. ज्याला फाशी द्यायची आहे, अशा व्यक्तीची उंची अन् तेवढेच वजन असलेला ‘डमी’ तयार केला जातो. किमान दोन आठवड्यांपूर्वीच फाशीची ट्रायल सुरू होते. ‘डमी’ला या दोन आठवड्यांत अनेकदा फासावर लटकविले जाते. काही अडचणी आहेत काय हे तपासण्यात येते.
दोराला केळी अन्
मधाची पेस्ट
फाशी देण्यासाठी विशेष प्रकारचा दोर तयार केला केला जातो. सूत्रांच्या माहितीनुसार, तागाच्या धाग्यापासून बनविलेल्या या दोराला तेलात मुरविले जाते. केळ्यांची पेस्ट आणि मधाचे मिश्रण लावून हा दोर तयार केला जातो. तो सहज नरम बनावा, फास आवळताना मध्येच अडकू नये यासाठी हे सर्व केले जाते.