कब्रस्तानात वृक्षराजी बहरली!
By Admin | Updated: July 10, 2016 02:41 IST2016-07-10T02:41:07+5:302016-07-10T02:41:07+5:30
येथील मुस्लीम बांधवांकडून आपल्या आप्तेष्टांच्या कबरींजवळ किमान एकतरी रोपटे लावले जात असून, त्याचे संवर्धनही तितक्याच तळमळीने केले जात आहे. पर्यावरणाच्या हितासाठी

कब्रस्तानात वृक्षराजी बहरली!
- अझहर शेख, नाशिक
येथील मुस्लीम बांधवांकडून आपल्या आप्तेष्टांच्या कबरींजवळ किमान एकतरी रोपटे लावले जात असून, त्याचे संवर्धनही तितक्याच तळमळीने केले जात आहे. पर्यावरणाच्या हितासाठी मुस्लीम समाजाने हे सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्यामुळे कब्रस्तान बहरले आहे.
शहरातील गावठाण भागातच खडकाळी येथील रसूलबाग व चौकमंडई येथील जहांगीर या दोन्ही कब्रस्तानांमध्ये दाट वृक्षराजी बहरली आहे.
मागील पाच वर्षांपासून मुस्लीम समुदायामध्ये कबरीजवळ झाड लावण्याबाबत जागृती निर्माण झाली आहे. धर्मगुरूंकडून प्रवचनातून होणारे प्रबोधन त्यासाठी उपयोगी ठरले आहे.
धर्मगुरूंकडून प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनी कब्रस्तानांमध्ये जाऊन दोन कबरींजवळ लावलेल्या रोपट्यांचे उदाहरण सांगितले जाते. पैगंबरांसोबत त्या वेळी असलेल्या सहकाऱ्यांनी त्यामागचे कारण विचारले असता पैगंबर म्हणाले, ‘‘जोपर्यंत या फांद्या हरित राहतील तोपर्यंत त्याचा फायदा कबरीमधील मृत व्यक्तीला पोहचून त्याचे पाप कमी होण्यास मदत होईल.’’ मुहम्मद पैगंबरांनी केलेले कार्य व दिलेली शिकवण म्हणून मुस्लीम समुदाय त्याचे अनुकरण करत मृत आप्तेष्टांच्या कबरीजवळ एक रोपटे लावत त्याची जोपासना येथे करत आहे. गुलाब, मोगरा, चमेली, सोनचाफा यांसारख्या फुलझाडांबरोबरच विलायती चिंच, अशोक, कडूनिंब, वड यांसारख्या प्रजातीची पर्यावरणपूरक रोपेही येथे लावली जात आहेत. या उपक्रमाला सर्व स्तरातून दाद मिळत आहे.
हजरत मुहम्मद पैगंबर यांचे कार्य आदर्श आहे. त्यांनी दिलेली शिकवण ही केवळ मानवजातीचेच नव्हे, तर अवघ्या सजीवसृष्टीच्या कल्याणाची आहे.
- मौलाना शाकीर रझा, धर्मगुरू