पुणे-सातारा महामार्गावर वाहतूककोंडी
By Admin | Updated: July 4, 2016 01:34 IST2016-07-04T01:34:21+5:302016-07-04T01:34:21+5:30
निकृष्ट कामामुळे रस्त्याला पडलेले खड्डे, त्यात साचलेले पाणी, चिखल, राडारोडा यामुळे पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाची पहिल्याच पावसात दुरवस्था झाली

पुणे-सातारा महामार्गावर वाहतूककोंडी
भोर : निकृष्ट कामामुळे रस्त्याला पडलेले खड्डे, त्यात साचलेले पाणी, चिखल, राडारोडा यामुळे पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाची पहिल्याच पावसात दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून, प्रवासी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यातच पोलिसांच्या दुर्लक्षामुळे महामार्गावरील वाहतूक चुकीच्या (उलट्या) दिशेने येत असल्याने आज सकाळी १०च्या सुमारास तासभर वाहतूक ठप्प होती.
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा भराव करून डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे २ दिवसांपासून पडणाऱ्या पहिल्याच पावसात डांबरीकरणाला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच पाणी साचून राडारोडा झाला आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने खड्ड्यात आपटत असून, अपघात होत आहेत. यामुळे महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. यामुळे वाहनांच्या रांगा लागत आहेत. मात्र याकडे महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराचे दुर्लक्ष होत आहे. पहिल्याच पावसात ही अवस्था झाली आहे. मोठा पाऊस झाल्यास वाहाळा बुजवल्याने व गटारे काढली नसल्याने सर्वच पाणी रस्त्यावर येऊन वाहतूक ठप्प होऊ शकते. आज सकाळी बोरमाळ खोपी येथील नवीन सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या मागे पावसामुळे व खेड शिवापूरजवळ रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असल्याने रस्ता खचला आहे. यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. महामार्गावर वाहतूक पोलीस नसल्याने टोलनाक्याजवळील पुणे बाजूकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक पुणेकडे जाणाऱ्या लेनमध्ये घुसल्याने सुमारे एक तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यामुळे खेड शिवापूर ते शिवरे गावापर्यंत २ किलोमीटर वाहनांच्या रांगा होत्या.
पहिल्याच पावसात पुणे-सातारा महामार्गाची अवस्था गावाकडच्या एखाद्या पाणंद रस्त्यासारखी झाली आहे. पहिल्याच पावसात निकृष्ट कामामुळे डांबरीकरण उखडले. रस्ता खचला. मोठमोठे खड्डे, चिखलाचा राडारोडा, सूचना फलक नाहीत, यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे.