कोकण रेल्वेची वाहतूक चार तास ठप्प
By Admin | Updated: July 11, 2016 05:37 IST2016-07-11T05:37:23+5:302016-07-11T05:37:23+5:30
मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीच्या इंजिनची चाके रविवारी सकाळी तळगाव येथे जाम होऊन इंजिन बंद पडले.

कोकण रेल्वेची वाहतूक चार तास ठप्प
कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीच्या इंजिनची चाके रविवारी सकाळी तळगाव येथे जाम होऊन इंजिन बंद पडले. त्यामुळे कोकण रेल्वेवरील वाहतूक सुमारे चार तास पूर्णपणे ठप्प होती. प्रत्येक स्थानकात विविध रेल्वेगाड्या उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
रविवारी सकाळी मालगाडी कुडाळ व ओरोस या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान असलेल्या तळगाव स्थानक येथे आली असता, या गाडीच्या इंजिनाची चाके जाम झाली. त्यामुळे इंजिनात बिघाड होऊन ही गाडी तळगाव येथील पटरीवरच अडकून पडली. त्यामुळे मुंबईहून गोव्याच्या दिशेने येणारी कोकणकन्या एक्स्प्रेस कणकवली येथे थांबविण्यात आली होती, तर ओरोस येथे होखा एक्स्प्रेस, नांदगाव येथे राज्यराणी एक्स्प्रेस, तसेच गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी नेत्रावती एक्स्प्रेस कुडाळ स्थानकात, दिवा गाडी सावंतवाडी येथे, तर मंगलोर एक्स्प्रेस कणकवली स्थानकावर थांबविण्यात आली होती. या घटनेमुळे दिवा व नेत्रावती एक्स्पे्रस सुमारे तीन तास उशिराने धावत होती. अखेर बंद पडलेल्या मालगाडीला होखा एक्स्प्रेसचे इंजिन जोडण्यात आले व सुमारे चार तासानंतर ही गाडी ओरोस येथे रेल्वेस्थानकात आणण्यात आली. त्यानंतर, या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. (प्रतिनिधी)