प्रत्यारोपणास परवानगी नाही!

By Admin | Updated: August 1, 2016 04:37 IST2016-08-01T04:37:04+5:302016-08-01T04:37:04+5:30

किडनी रॅकेट १४ जुलैला उघडकीस आल्यानंतर, हिरानंदानी रुग्णालयाचा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा परवाना रद्द करण्यात आला.

Transplanting is not allowed! | प्रत्यारोपणास परवानगी नाही!

प्रत्यारोपणास परवानगी नाही!


मुंबई : किडनी रॅकेट १४ जुलैला उघडकीस आल्यानंतर, हिरानंदानी रुग्णालयाचा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा परवाना रद्द करण्यात आला. त्यामुळे रखडलेल्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची परवानगी मिळावी, म्हणून आरोग्य विभागाशी रुग्णालयाने पत्रव्यवहार केला. मात्र, परवानगीची मागणी फेटाळण्यात आली. चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत परवानगी मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
१४ जुलैला हिरानंदानी रुग्णालयात रुग्ण ब्रीजकिशोर जैस्वालवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली होती. जैस्वाल यांना किडनीदान करणारी त्यांची पत्नी असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र, ती त्यांची पत्नी नसल्याचे उघड झाल्यावर पोलिसांनी ही शस्त्रक्रिया थांबविली. शोभा ठाकूर नामक महिला जैस्वाल यांच्याकडून पैसे घेऊन किडनीचे दान करणार होती. किडनी रॅकेट प्रकरणी रुग्णालयाचा प्रत्यारोपण समन्वयक नीलेश कांबळे हा मुख्य आरोपी आहे. १६ जुलैला रुग्णालयाच्या प्रत्यारोपणाचा परवाना रद्द करण्यात आला. १० दिवस उलटूनही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बंद असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रुग्णालयाने प्रत्यारोपणाची परवानगी मिळावी, म्हणून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद आणि सार्वजनिक आरोग्य सेवा यांना पत्र पाठविल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. आरोग्य सेवेचे संचालक डॉ. मोहन जाधव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. किडनी रॅकेटची चौकशी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आता त्यांना परवानगी देता येणार नसल्याचे डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
>अंतर्गत समिती
रुग्णालयाने किडनी रॅकेटमध्ये खोटी कागदपत्रे कशी सादर झाली, याच्या चौकशीसाठी अंतर्गत समितीची स्थापना केली आहे. कागदपत्रांवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोषी कोण, हे शोधता येईल. रुग्णालयाची अंतर्गत समितीदेखील चौकशी करत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Web Title: Transplanting is not allowed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.