ससून डॉकचा कायापालट
By Admin | Updated: July 29, 2016 01:54 IST2016-07-29T01:54:00+5:302016-07-29T01:54:00+5:30
मुंबईतील ससून डॉकचा संपूर्ण कायापालट करणाऱ्या योजनेला मंजुरी देण्यात आली असून न्यू यॉर्कमधील फुलटॉन मत्स्य बाजाराच्या धर्तीवर या ठिकाणी बाजाराची उभारणी केली

ससून डॉकचा कायापालट
- यदु जोशी, मुंबई
मुंबईतील ससून डॉकचा संपूर्ण कायापालट करणाऱ्या योजनेला मंजुरी देण्यात आली असून न्यू यॉर्कमधील फुलटॉन मत्स्य बाजाराच्या धर्तीवर या ठिकाणी बाजाराची उभारणी केली जाणार आहे. जगातील सर्वात सुंदर अशा सिडने बंदराप्रमाणे आता ससून डॉकचे रुपडे पालटणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत ५२ कोटी १७ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. १८७१ मध्ये अस्तित्वात आलेल्या ससून डॉकचे आधुनिकीकरण करताना त्याचा विकास एक पर्यटनस्थळ म्हणून देखील करण्यात येणार आहे.
सध्याच्या मत्स्य लिलाव शेडचे नूतनीकरण, जेटीचे सक्षमीकरण, जोड मार्ग व अंतर्गत रस्ते सुधारणा, वीजपुरवठा सुधारणा, वनिकरण, टॉक्झिक वेस्ट संकलन केंद्र, नवीन इमारतीत पाईपलाईन टाकणे, कार्यशाळा, सुरक्षागृह, सीसीटीव्ही कॅमेरे, संरक्षक भिंत, सौंदर्यीकरण, अग्निशमन यंत्रणेचे आधुनिकीकरण, मलनि:स्सारण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.
विद्यमान सर्व्हिस ब्लॉक्सचे रुपांतर आधुनिक बंदर व्यवस्थापन व मेनेन्स ब्लॉकमध्ये केले जाईल. मासेमारांसाठी आरामगृह उभारण्यात येणार आहे.
मच्छिमार विकास मंडळातर्फे विकास
- व्हिक्टोरिया बेसिनची दुरुस्ती, रेडिओ कम्युनिकेशन यंत्रणा उभारणे ही कामेही करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र मच्छिमार विकास महामंडळामार्फत हा आधुनिकीकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी ससून डॉकच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते.