महाराष्ट्रात 137 पोलीस अधिका-यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2017 16:53 IST2017-04-28T16:53:17+5:302017-04-28T16:53:17+5:30
महाराष्ट्र सरकारने पोलिस विभागात मोठा बदल केला असून राज्यातील वरिष्ठ अधिका-यांसह 137 अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत.

महाराष्ट्रात 137 पोलीस अधिका-यांच्या बदल्या
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - महाराष्ट्र सरकारने पोलिस विभागात मोठा बदल केला असून राज्यातील वरिष्ठ अधिका-यांसह 137 अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्य सरकारच्या गृहविभागाकडून पोलीस अधिका-यांच्या बदलींसंदर्भात काल रात्री आदेश काढण्यात आला. यामध्ये 16 विशेष महानिरीक्षक, 17 उपनिरीक्षक आणि 104 अधीक्षकांच्या समावेश आहे.
राज्य पोलीस मुख्यालयामध्ये विशेष महानिरीक्षक (व्यवस्थापकीय) पदावर असलेल्या अर्चना त्यागी यांची मुंबईच्या सहआयुक्तपदी (व्यवस्थापकीय) नियुक्ती केली आहे. सहआयुक्तपद (सीपी) हे विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या बरोबरीचे आहे, तर एसपी पद हे पोलीस उपायुक्त (डीसीपी) पदाच्या बरोबरीचे आहे.
ठाण्याचे सहआयुक्त आशुतोष दुब्रे यांची मुंबईच्या आर्थिक गुन्हा विभागात सहआयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. तर, औरंगाबादचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मुंबईच्या वाहतूक विभागात सहआयुक्तपदी वर्णी लावण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त प्रवीण पडवळ यांची बढती करण्यात आली असून त्यांच्याकडे मुंबईच्या (दक्षिण विभाग) अतिरिक्त पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अमरावती ग्रामीण विभागाच्या पोलीस अधीक्षक लख्मी गौतम यांना सुद्धा बढती देण्यात आली असून त्यांच्या मुंबईच्या (पूर्व विभाग) अतिरिक्त आयुक्तपदी निवड केली आहे. मुंबईचे पोलीस उपायुक्त एस जयकुमार यांना मुंबईच्या (मध्य विभाग) अतिरिक्त आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. नवी मुंबईचे सहआयुक्त मधुकर पांडे यांची त्याच पदावर ठाणे शहर येथे बदली करण्यात आली आहे. तर, राज्य गुप्तचर विभागाचे सहआयुक्त संतोष रस्तोगी यांची नवी मुंबईच्या सहआयुक्तपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईतील सीआयडी विभागाचे महासंचालक रविंद्र कदम यांची पुण्याच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सुनील रामानंद यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, 11 अधिका-यांना मुंबई विभागात पोलीस उपायुक्तपदी म्हणून निवड करण्यात आली आहे.