लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करा, असे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी एसटी प्रशासनाला दिले. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बोलावलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यासह एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अनेक अधिकारी एकाच मुख्यालयात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसल्यामुळे त्यांचे काही ठरावीक कर्मचाऱ्यांशी हितसंबंध निर्माण होतात. त्यातून ते इतर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय करतात. याचा विपरीत परिणाम एसटी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर होत आहे. त्यामुळे भविष्यात एकाच मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी पडळकर यांनी बैठकीत केली. त्याला दुजोरा देत मंत्री सरनाईक यांनी याबाबत आढावा घेऊन तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.
आर्थिक मागण्यांसंदर्भात अधिवेशनानंतर निर्णय
- यावेळी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
- संगमनेर बस स्थानकातील समस्यांसंदर्भात आमदार सत्यजित तांबे व अमोल खताळ यांच्या शिष्टमंडळासमवेत मंत्री सरनाईक यांनी चर्चा केली. नाशिक-पुणे महामार्गावरून जाणाऱ्या बस संगमनेर बस स्थानकात थांबविण्यासह विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.