गाड्या वाढताहेत; सुरक्षेचे काय?
By Admin | Updated: July 10, 2014 00:57 IST2014-07-10T00:57:16+5:302014-07-10T00:57:16+5:30
अर्थसंकल्पात नागपूरला नव्या दोन गाड्या मिळून आठ गाड्या नागपूरमार्गे धावणार आहेत. प्रत्येक अर्थसंकल्पात नव्या गाड्यांची घोषणा होते. परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलाच विचार होत नाही.

गाड्या वाढताहेत; सुरक्षेचे काय?
अपुरी सुरक्षा यंत्रणा : चोऱ्या वाढल्या, रेल्वे रूळही दुर्लक्षितच
दयानंद पाईकराव - नागपूर
अर्थसंकल्पात नागपूरला नव्या दोन गाड्या मिळून आठ गाड्या नागपूरमार्गे धावणार आहेत. प्रत्येक अर्थसंकल्पात नव्या गाड्यांची घोषणा होते. परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलाच विचार होत नाही. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितताच धोक्यात आली असून नव्या गाड्या नकोत आधी सुरक्षा पुरवा, असे म्हणण्याची पाळी प्रवाशांवर आली आहे.
नागपूर शहर देशाच्या केंद्रस्थानी आहे. नागपूर शहरातून दररोज १५० ते १६० रेल्वेगाड्या आणि ५० ते ६० हजार प्रवासी ये-जा करतात. रेल्वेगाड्यात प्रवाशांचे साहित्य चोरीला जाणे, पाकीट मारणे, मोबाईल पळविणे या घटना दररोजच्या झाल्या आहेत. रेल्वेगाड्यांच्या स्लिपर क्लासमध्ये तर सोडा एसी कोचमधील प्रवासी सुरक्षित नाहीत. अनेक गाड्यात ‘आरपीएफ’ जवानांची संख्या पुरेशी नसल्याने गस्त होत नाही. याचा फायदा चोरट्यांना मिळून ते थेट कोचमध्ये शिरून प्रवाशांची रोख रक्कम, दागिने, महागडे साहित्य लंपास करीत आहेत. नागपूर-सेवाग्राम या मार्गावर मागील अर्थसंकल्पात थर्ड लाईनच्या कामाला मंजुरी मिळाली. या मार्गाची रेल्वेगाड्या चालविण्याची क्षमता १०० असताना तेथे १५० रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. हा थेट रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ आहे. त्यामुळे थर्ड लाईनचे काम तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे. परंतु या थर्डलाईनच्या १५०० कोटींच्या प्रकल्पासाठी मागील वर्षी २६.३६ कोटी आणि या वर्षी १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या थर्डलाईनसाठी अशाच पद्धतीने निधीची तरतूद केल्यास हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी १० वर्षे लागतील, यात शंका नाही. नागपूर-वर्धा मार्गावर रनिंग कर्मचाऱ्यांच्या ड्युटीचे प्रमाणही १० तासांच्या वर होत असून विभागात लोकोपायलटची संख्याही कमी असल्यामुळे अधिक काम करणाऱ्या लोकोपायलटच्या हातून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने नव्या गाड्यांची घोषणा करण्यापूर्वी सुरक्षेच्या बाबतीत विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)