मोबाइल स्कॅन होताच मिळणार रेल्वेचे तिकीट

By Admin | Updated: January 30, 2015 05:12 IST2015-01-30T05:12:18+5:302015-01-30T05:12:18+5:30

तिकिटांच्या रांगेतून सुटका करण्यासाठी रेल्वेने मोबाइल तिकीट सेवा प्रवाशांसाठी आणली. मात्र या सेवेचा लाभ घेताना प्रवाशांना अनेक प्रक्रिया पार

Train ticket to get same as mobile scan | मोबाइल स्कॅन होताच मिळणार रेल्वेचे तिकीट

मोबाइल स्कॅन होताच मिळणार रेल्वेचे तिकीट

मुंबई : तिकिटांच्या रांगेतून सुटका करण्यासाठी रेल्वेने मोबाइल तिकीट सेवा प्रवाशांसाठी आणली. मात्र या सेवेचा लाभ घेताना प्रवाशांना अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. हे पाहता मोबाइल तिकीट सेवेचा दुसरा पर्यायही रेल्वेकडून आणला जाणार आहे. मोबाइल स्कॅन करून रेल्वेचे तिकीट प्रवाशांना उपलब्ध करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. यासाठी स्थानकांवर एक मोबाइल स्कॅनिंग मशिनही बसविण्यात येईल. ही सेवा मार्चपर्यंत आणण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.
डिसेंबर महिन्यात रेल्वेकडून मोबाइल तिकीट सेवा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली. यासाठी रेल्वेच्या ‘क्रिस’कडून (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम) मोबाइल तिकीट सेवा उपलब्ध करण्यासाठी स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्यात आले. हे अ‍ॅप अ‍ॅण्ड्रोईड फोनमध्ये गुगल प्ले स्टोअरमधून तर विंडोज फोनवर विंडोज स्टोअरमधून डाऊनलोड करावे लागत आहे. प्रवाशाला सगळी नोंदणी प्रक्रिया पार पाडताना एक कायमस्वरूपी पासवर्डबरोबरच मोबाइल नंबर, नाव आणि शहराचे नाव नोंदवावे लागत आहे. त्यानंतर नोंदणीची सगळी प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर शून्य बॅलन्स आर-वॉलेट खाते युनिक लॉगिन आयडी आणि पासवर्डद्वारे सुरू करावे लागत असून, त्यानंतर प्रवाशाला यूटीएस बुकिंग काउंटर्सवरून १00 ते ५ हजार रुपयांपर्यंतचे आर वॉलेट रिचार्ज करावे लागत आहे. त्यानंतरही तिकीट मिळविण्यासाठी आणखी प्रक्रिया पार पाडावी लागत असल्याने प्रवाशांना मनस्ताप होत आहे. ही सेवा सुरू करण्यापूर्वी स्थानकांवर आलेल्या प्रवाशाला मोबाइल स्कॅन करून रेल्वेचे तिकीट उपलब्ध करण्याचा रेल्वेचा प्रयत्न होता. मात्र काही तांत्रिक कारणांची अडचण आणि ही सेवा काही कंपन्यांद्वारे देताना निविदा प्रक्रियेस लागलेला वेळ पाहता ती मागे पडली.
मात्र आता ही सेवा प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा रेल्वेचा प्रयत्न असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. मोबाइलवर तिकिटांची माहिती मिळाल्यानंतर स्थानकात आलेल्या प्रवाशाला एका स्कॅनिंग मशिनवर मोबाइल ठेवून तत्काळ रेल्वेचे तिकीट मिळेल. यासाठी स्थानकांवर मोबाइल स्कॅनिंग मशिन (कियॉस्क) बसविण्यात येईल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Train ticket to get same as mobile scan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.