ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २० - वनविभागातील जय बेपत्ता असताना आधीच वन्यजीव प्रेमी निराश झालेले असताना दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमधून रेल्वे सुरक्षा दलाने शनिवारी दुपारी १२.५० वाजता दुर्मिळ प्रजातीच्या ८ पक्ष्यांची तस्करी पकडली. या तस्करीतील आरोपी फरार झाले असून ही घटना नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर घडली. हे पक्षी वन विभागाच्या अधिकाºयांकडे सुपुर्द करण्यात आले आहेत.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांना दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमधून दुर्मिळ प्रजातीच्या पक्षांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार कमांडंट ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, आरपीएफचा जवान विकास शर्मा, विनोद राठोड, बिक्रम यादव, किशोर चौधरी यांनी रेल्वेगाडी क्रमांक १२७९२ दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसची तपासणी केली. यावेळी एस १२ कोचमध्ये बर्थ क्रमांक ७, ८ च्या खाली दोन प्लॉस्टिकच्या बॅगमध्ये हे ८ पक्षी आढळले. आजुबाजुच्या प्रवाशांना विचारणा केली असता या पक्षांवर कोणीच हक्क सांगितला नाही. तस्करीसाठी नेण्यात येत असलेल्या पक्ष्यात ५ मोठे आणि ३ दुर्मिळ प्रजातीच्या पक्ष्यांचा समावेश आहे. आरपीएफच्या वतीने याबाबत वन विभागाच्या अधिका-यांना सूचना देण्यात आली.