अमरावती मध्यवर्ती कारागृहात गांजाची तस्करी
By Admin | Updated: September 25, 2014 01:29 IST2014-09-25T01:29:41+5:302014-09-25T01:29:41+5:30
येथील मध्यवर्ती कारागृहात गांजाची तस्करी करणाऱ्या एका पोलिसाला मंगळवारी फ्रेजरपुरा पोलिसांनी रंगेहात अटक केली. विनोद मनोहरराव लोहकरे (४५) असे अटकेतील पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

अमरावती मध्यवर्ती कारागृहात गांजाची तस्करी
पोलीस कर्मचारी जेरबंद : ६० ग्रॅम गांजा जप्त
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात गांजाची तस्करी करणाऱ्या एका पोलिसाला मंगळवारी फ्रेजरपुरा पोलिसांनी रंगेहात अटक केली. विनोद मनोहरराव लोहकरे (४५) असे अटकेतील पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, विनोद लोहकरे हा अमरावती मध्यवर्ती कारागृहात पोलीस शिपाई पदावर कार्यरत असून तो तेथील कारागृह वसाहतीतच राहतो. मंगळवारी सकाळी ९ वाजता तो कारागृहात कर्तव्यावर आला. कर्तव्यावरील पोलीस कर्मचारी दरेसिंग गुलाबसिंग चव्हाण यांच्यासह काही कर्मचारांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद आढळून आल्या. ही माहिती चव्हाण यांनी वरिष्ठ तुरुंग अधिकारी एच. बी. कुंटे, मंडल तुरुंग अधिकारी डी. एन. खांडेकर, उल्हास ठाकरे यांना दिली. घटनेची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांनाही देण्यात आली. पोलीस निरीक्षक रियाजोद्दीन देशमुख कर्मचाऱ्यांसह कारागृहात दाखल झाले. त्यांनी लोहकरेची अंगझडती घेतली असता त्यांना लोहकरेने बुटात व मोजांमध्ये लपवून ठेवलेल्या ६० ग्रॅम गांजाच्या सहा पुड्या मिळाल्या.
याप्रकरणी पोलिसांनी लोहकरेविरुद्ध एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. लोहकरे हा कारागृहात कैद्यांना गेल्या अनेक दिवसांपासून गांजा पुरवित असल्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)