वडघर पुलावर वाहतूक सुरूच
By Admin | Updated: April 8, 2017 03:39 IST2017-04-08T03:39:38+5:302017-04-08T03:39:38+5:30
सावित्री नदीवरचा जुना पूल वाहून गेल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जुने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते

वडघर पुलावर वाहतूक सुरूच
मयूर तांबडे,
पनवेल- गेल्या वर्षी गोवा महामार्गावरील महाड - पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा जुना पूल वाहून गेल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जुने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. पनवेलमधील ब्रिटिशकालीन वडघर-करंजाडे पूलदेखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
तब्बल८९ वर्षे जुना असलेला पनवेल येथील वडघर-करंजाडे पूल बंद केला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फेआॅगस्ट २०१६ मध्ये सांगण्यात आले होते. महाड येथील झालेल्या दुर्घटनेनंतर बांधकाम विभागाला हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याची जाग आली होती. आता कोणतीही डागडुजी न करता पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.
वडघर-करंजाडे पूल उरण-पनवेल रस्त्यावरील गाढी नदीवरील पूल म्हणून ओळखला जातो. उपविभागाच्या अखत्यारीतील उरण-पनवेल दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १०३ वर गाढी नदीवर ब्रिटिशकालीन पूल १९२७ मध्ये बांधण्यात आलेला आहे.
पुलाची लांबी १४८ मीटर असून त्यात ५९० मीटरचे २५ गाळे आहेत. याठिकाणी बाजूला नवीन पुलाची बांधणीसुद्धा करण्यात आली आहे. पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी पुलावरून वाहतूक करताना अपघात घडू नये, यासाठी बॅरीकेट्स लावून पुलावरील वाहतूक बंद केली होती.
पुलावरून वाहतूक होऊ नये यासाठी दगड देखील लावण्यात आले होते. मात्र, वाहतूकदारांनी बॅरीकेट्स व दगड काढून वाहतूक सुरू केली आहे.
वडघर-करंजाडे पुलाला वाहनतळाचे स्वरूप आले आहे. कमकुवत झालेल्या या जुन्या पुलावरून वाहतूक करणे धोक्याचे असताना देखील चालक दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. चारचाकी गाड्या तसेच मोठमोठ्या टेम्पोची पुलावरून दिवस-रात्र वर्दळ असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने वेळीच याकडे लक्ष देऊन वाहतूक व्यवस्था बंद करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
वडघर पुलावरून वाहतूक सुरू झाल्याबाबत वाहतूक पोलिसांना कळविण्यात आले आहे. यापूर्वी ड्रम लावून संपूर्ण रस्ता बंद करण्यात आला होता. पुन्हा एकदा तो रस्ता बंद करू.
- एस.एम.कांबळे,
सहायक अभियंता,
सार्वजनिक बांधकाम खाते, पनवेल
सार्वजनिक बांधकाम खात्याने कायमस्वरूपी वडघर-करंजाडे पूल बंद केला असून, असा फलक या ठिकाणी लावणे गरजेचे आहे. तसेच बॅरीगेट्स लावून रस्ता बंद करायला हवा.
- विजय कादबाने,
पोलीस निरीक्षक,
पनवेल शहर वाहतूक