तळीरामांना वाहतूक नियम ‘अमान्य’
By Admin | Updated: April 13, 2017 01:22 IST2017-04-13T01:22:23+5:302017-04-13T01:22:23+5:30
राज्यात गेल्या दोन वर्षांत दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात केलेल्या कारवाईच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील शहर, ग्रामीण भागातील

तळीरामांना वाहतूक नियम ‘अमान्य’
- सुशांत मोरे, मुंबई
राज्यात गेल्या दोन वर्षांत दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात केलेल्या कारवाईच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील शहर, ग्रामीण भागातील रस्त्यांबरोबरच महामार्गांवर २०१६मध्ये केलेल्या कारवाईत तब्बल १ लाख ८ हजार ५६४ प्रकरणे दाखल झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांतील सूत्रांनी दिली. ही आकडेवारी पाहता चालकांना वाहतूक नियम मान्यच नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.
‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ रोखणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. त्यासाठी वेळोवेळी विशेष मोहीम हाती घेण्यात येते. तळीराम चालकांविरोधात कारवाईचा बडगा उचलण्यात येत असून, राज्यात २०१६मध्ये १ लाख ८ हजार ५६४ प्रकरणे दाखल झाल्याचे उघडकीस आले आहे. २०१५मध्ये कारवाईचा आकडा पाहिल्यास तो ५३ हजार ४९ एवढा होता. त्यामुळे दोन वर्षांत केलेली कारवाई पाहिल्यास ती दुप्पट झाल्याचे दिसते. याचाच अर्थ वाहन चालकांकडून बिनदिक्कतपणे नियमाला तिलांजली दिली जात आहे. त्यांच्यावर केलेल्या दंडात्मक कारवाईत १९ कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केल्याचे सांगण्यात आले.
राज्यात एकूण होणाऱ्या अपघातांपैकी दारू पिऊन वाहन चालवताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण हे ०.५६ टक्के एवढे आहे. तर विविध अपघातांत मृत होणाऱ्यांपैकी ०.४५ टक्के मृत्यू हे दारू पिऊन वाहन चालवताना झालेल्या अपघातांतील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
२०१६मध्ये महामार्ग पोलिसांकडे दाखल असलेल्या अधिकृत माहितीत ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या अपघातांत सुमारे ५८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.