वाहतूक पोलिसावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2016 02:13 IST2016-08-25T02:13:12+5:302016-08-25T02:13:12+5:30

विना हेल्मेट प्रवास करत असताना अडविल्याच्या रागातून दुचाकीस्वारांनी वाहतूक पोलीस विलास शिंदेवर प्राणघातक हल्ला चढविला.

Traffic Police Attack | वाहतूक पोलिसावर हल्ला

वाहतूक पोलिसावर हल्ला


मुंबई : विना हेल्मेट प्रवास करत असताना अडविल्याच्या रागातून दुचाकीस्वारांनी वाहतूक पोलीस विलास शिंदेवर प्राणघातक हल्ला चढविला. शिंदे यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर लिलावती रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खार पोलिसांनी दोन तरुणांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, १७ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिंदे यांची बुधवारी भेट घेतली.
मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागात कार्यरत असलेले विलास शिंदे हे मंगळवारी दुपारी खारमधील एस.व्ही. रोडवर कर्तव्य बजावत होते. दुपारी तीनच्या सुमारास विनाहेल्मेट भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराला त्यांनी अडविले. शिंदे यांनी या तरुणांकडे गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्रे नसल्याने त्या तरुणांनी शिंदे यांच्याशी हुज्जत घालत त्यांना लाकडी बांबूने मारहाण करण्यास सुरुवात केली. बांबूचा जोराचा फटका डोक्यात बसल्याने शिंदे रक्तबंबाळ होऊन रस्त्यात कोसळले. शिंंदे यांच्यावर हल्ला झाल्याचे लक्षात येताच, अन्य पोलीस कर्मचारी त्यांच्या मदतीसाठी धावले. ही संधी साधून दोन्ही तरुणांनी तेथून पळ काढला. जखमी अवस्थेतील शिंदे यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करून खार पोलिसांनी हल्लेखोर तरुणांचा शोध सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे १७ वर्षीय तरुणाला अटक करण्यात पोलिसांना यश आले, तर या तरुणाचा २० वर्षीय भाऊ अहमद कुरेशी हा पसार असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. समाजसेवक असलेल्या त्याच्या आईकडेदेखील पोलीस चौकशी करत आहेत. (प्रतिनिधी)
>सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे १७ वर्षीय तरुणाला अटक करण्यात पोलिसांना यश आले, तर या तरुणाचा २० वर्षीय भाऊ अहमद कुरेशी हा फरारी आहे.
>२०१६ मध्ये झालेले हल्ले
८ आॅगस्ट - सांताक्रुझ वाहतूक पोलीस शाखेच्या संजय हळके या कर्मचाऱ्याला मारहाण झाली. पोलिसांनी जगदीश शर्मा (३३) आणि राजेश राय (२५) या दोघा वाहन चालकांना अटक करण्यात आली.
७ एप्रिल - विलेपार्ले वाहतूक शाखेमध्ये कार्यरत अमुकसिद्ध धुलप्पा करपे या हेड कॉन्स्टेबलने कार चालकाला लायसेन्स आणि गाडीची कागदपत्रे दाखविण्यास सांगितली. कागदपत्रे दाखविण्यास विरोध करपे यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी जिमित वडेरा आणि मयांक ठक्कर या दोघांना अटक केली.
२५ फेब्रुवारी - गोरेगाव वाहतूक शाखेत कार्यरत असलेले दत्ताराम घुगे यांच्यावर गोरेगावच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील बिंबीसार परिसरात हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी ट्रक चालक मोहम्मद उस्मान कमरुल हक आणि ट्रक क्लीनर अहमदअली मोहम्मद आमीन यांना वनराई पोलिसांनी अटक केली.
५ मार्च - डी एन नगर वाहतूक शाखेत काम करणाऱ्या संजय नवले यांच्यावर आयओसी जंक्शनजवळ विकी साळवे आणि शाम बनसोडे या मोटरसायकलस्वारांनी हल्ला केला होता. याप्रकरणी डी एन नगर पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती.
२५ मार्च - जे.जे ब्रिजवर मोटर सायकल चालविण्यास बंदी असताना देखील याठिकाणी मोटरसायकल चालावीणाऱ्या अहमद अन्सारी आणि मेवियन अन्सारी यांनी पायधुनी वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई अमोल गवाणकर यांना मारहाण केली होती. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी या दोघांना अटक केली होती.
१४ मार्च - दक्षिण मुंबईतील नागपाडा वाहतूक शाखेच्या एका महिला पोलिसाला अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकावीणाऱ्याचा प्रकार महालक्ष्मी जंक्शनकडे घडला होता. याप्रकरणी मयुर जेधे या तरुणाला अटक करण्यात आली होती.

Web Title: Traffic Police Attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.