खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी
By Admin | Updated: August 3, 2016 02:11 IST2016-08-03T02:11:58+5:302016-08-03T02:11:58+5:30
खड्ड्यामुळे अरुणकुमार वैद्य मार्गावरील ओबेरॉय मॉल जंक्शन ते नागरी निवारा येथील सारस्वत बँक जंक्शनपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत

खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी
मनोहर कुंभेजकर,
मुंबई- गोरेगाव पूर्वेकडील पश्चिम द्रुुतगती महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे अरुणकुमार वैद्य मार्गावरील ओबेरॉय मॉल जंक्शन ते नागरी निवारा येथील सारस्वत बँक जंक्शनपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. येथील वाहतूककोंडीने वाहनचालक आणि नागरिक कमालीचे त्रस्त झाले असून, हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा की महापालिकेचा? या वादात तक्रार नक्की कोणाकडे करायची? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
दिंडोशी उड्डाणपुलापासून आरे चेक नाका आणि ओबेरॉय मॉल जंक्शन ते आयटी पार्क येथील गर्दीच्या रस्त्यावर ओबेरॉय मॉल जंक्शन, रत्नागिरी हॉटेल जंक्शन, नागरी निवारा येथील सारस्वत बँक जंक्शन येथे खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. शिवाय वाहतूककोंडीत भर पडत असल्याने वेळही वाया जात आहे. रस्त्यावर टाकलेली खडी आणि पेव्हर ब्लॉक उखडल्याने समस्येत भरच पडली आहे. आयटी पार्क येथे दररोज सुमारे शेकडोहून अधिक खासगी बस आणि रिक्षा ये-जा करतात. येथे वाहतुकीची वर्दळ असतानाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. या समस्येकडे महापालिकेच्या पी/दक्षिण, पी (उत्तर) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचे रिक्षाचालकांसह वाहनचालकांनी सांगितले.
>दिंडोशी आगारातून मुंबई, नवी मुंबई, मुलुंड, भार्इंदर या विविध ठिकाणी अनेक बस पहाटे ते मध्यरात्रीपर्यंत ये-जा करतात. मात्र खड्ड्यामुळे प्रवासाला वेळ लागतो. शिवाय ओबेरॉय ते कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्स या प्रवासासाठीही विलंब लागत असल्याचे अमेय जेऊरकर या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने सांगितले.
महापालिकेच्या पी
(उत्तर) विभागाच्या साहाय्यक पालिका आयुक्त संगीता हसनाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाल्या नाहीत.
>मागील काही दिवसांपासून पावसाचा जोरदार मारा सुरू आहे. त्यामुळे येथे खड्डे पडले आहेत. याप्रकरणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधला होता. शिवाय येथील खड्डे बुजवण्याचे आदेश दिले. ओबेरॉय मॉल जंक्शन ते आरे चेक नाका येथील खड्डे सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने बुजवावेत, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्याकडे केली आहे.- सुनील प्रभू, आमदार