नागरी समस्यांचा घेणार मागोवा

By Admin | Updated: July 31, 2016 03:13 IST2016-07-31T03:13:30+5:302016-07-31T03:13:30+5:30

नगरसेवकांनी प्रभागात केलेल्या कामांचा ऊहापोह ‘लोकमत’च्या माध्यमातून केला जाणार आहे.

Track civilian issues | नागरी समस्यांचा घेणार मागोवा

नागरी समस्यांचा घेणार मागोवा


ठाणे : काही महिन्यांवर ठाणे महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली आहे. पाच वर्षांत प्रभागातील नागरिकांच्या समस्या सुटल्यात का, याचा मागोवा घेण्यासाठी आणि नगरसेवकांनी प्रभागात केलेल्या कामांचा ऊहापोह ‘लोकमत’च्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यानुसार, बुधवारी याची सुरुवात प्रभाग क्रमांक -२ मधून होणार आहे.
सकाळी ११ वाजता ब्रह्मांड येथील सांजस्नेह ज्येष्ठ नागरिक हॉल, फेज -२, पोलीस बीटजवळ, आझादनगर येथे ‘लोकमत आपल्या दारी’अंतर्गत स्थानिक नगरसेवकांना आमंत्रित केले जाणार आहे. प्रभाग क्रमांक-२ ची लोकसंख्या सुमारे २९ हजारांच्या घरात आहे. पातलीपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, हिरानंदानी इस्टेट, आयुक्त निवास, ब्रह्मांड, आझादनगरचा काही भाग आणि मानपाड्यातील शिवाजीनगर असा मिळून हा प्रभाग तयार झाला आहे. विजेचा खेळखंडोबा, त्याचबरोबर वारंवार तारा तुटण्याचे प्रकार या ठिकाणी घडतात. यामुळे एकदा वीजप्रवाह खंडित झाला, तर तो पूर्ववत होण्यास पाच ते सात तास लागतात. प्रभागातील स्वच्छतागृहांचीही दुरवस्था झाली आहे. यात सर्वात मोठी समस्या म्हणजे नळावाटे येणारे पाणी. हे पाणी अतिशय गढूळ येत असून नागरिकांना नळाला पाणी आल्यानंतर अर्धा तास गढूळ पाणी जाईपर्यंत नळ सुरू ठेवावा लागतो. दुसरीकडे डोंगरीपाडा भागात असलेल्या किंगकाँगनगर भागात बेकायदा बांधकामे उभी राहिली असून या भागांना पालिकेने पाणी देण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी येथील नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला होता. ब्रह्मांडच्या नागरिकांना ठाणे परिवहनच्या अपुऱ्या बससेवेचा त्रास सहन करावा लागत आहे. एक बस गेल्यावर अर्ध्या तासाहून अधिक वेळ येथे बस नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते.
यासह इतर समस्यांचाही मागोवा या कार्यक्रमांतर्गत घेतला जाणार असून नागरिकांनी आपल्या नगरसेवकाला, पालिका अधिकाऱ्यांना आणि इतर प्रशासनाला आपल्या कामांचा जाब विचारण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे, पालिकेचे माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त मारुती गायकवाड उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Track civilian issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.