विषारी जेली फिश आक्सा किनाऱ्यावर
By Admin | Updated: August 24, 2015 00:56 IST2015-08-24T00:56:45+5:302015-08-24T00:56:45+5:30
समुद्राच्या वाहत्या पाण्याबरोबर आज आक्सा समुद्रकिनारी निळ्या रंगाचे विषारी जेली फिश आल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये घबराट पसरली आहे

विषारी जेली फिश आक्सा किनाऱ्यावर
मुंबई : समुद्राच्या वाहत्या पाण्याबरोबर आज आक्सा समुद्रकिनारी निळ्या रंगाचे विषारी जेली फिश आल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये घबराट पसरली आहे. आक्सा बीचवर ३-४ पर्यटकांना आणि जीवरक्षक सचिन मुळीक यांना जेली फिशने डंख मारला आहे, अशी माहिती पलिकेचे निवृत जीवरक्षक रजनीकांत माशेलकर यांनी दिली.
दरवर्षी पाऊस पडल्यावर जेलीफिश मुंबईच्या समुद्रकिनारी येतात. मात्र यंदा समाधानकारक पाऊस पडला नसल्याने जेली फिशचे आगमन तसे उशिराच झाले. समुद्राच्या पाण्याचा रंग निळा आणि जेली फिश हादेखील निळ्या रंगाचा असल्यामुळे पर्यटकांना तो दिसत नाही. मात्र त्याने डंख मारल्यावर त्याची दाहकता लक्षात येते. निळ्या रंगाचा फुग्याच्या आकाराच्याा असणाऱ्या या जेली फिशला एक छोटा आणि एक मोठा दोरा असतो. जेली फिशने पायाला, गुप्तांगावर आणि हाताला डंख मारल्यास काखेत गाठ येते, असे माशेलकर म्हणाले. आज ते निवृतीनंतरदेखील सामजिक बांधिलकी म्हणून आक्सा समुद्रकिनारी गस्त घालतात.
समुद्रकिनाऱ्यावर आल्यावर जेली फिशचे अर्धे आयुष्य संपलेले असते. मात्र तरी त्याचा डंख असह्य असतो. सुमारे एक तास त्याच्या डंखाचा परिणाम राहतो. जेली फिशने डंख मारल्यास जखमेच्या जागी लिंबू, शेण लावल्यास त्याची दाहकता काही प्रमाणात कमी होते, अशी माहिती माशेलकर यांनी दिली. (प्रतिनिधी)