हुल्लडबाजांमुळे पर्यटकांचा हिरमोड
By Admin | Updated: August 3, 2016 02:05 IST2016-08-03T02:05:35+5:302016-08-03T02:05:35+5:30
लोणावळ्यातील मुसळधार पाऊस, दाट धुके, भुशी डॅम, तेथील उत्तुंग कडे, भन्नाट वारे, आकर्षित करणारी हिरवाई, पाण्याने तुडुंब भरलेली भातखाचरे, छोटे-मोठे धबधबे

हुल्लडबाजांमुळे पर्यटकांचा हिरमोड
वडगाव मावळ : मावळ तालुका म्हटलं की, डोळ्यांसमोर येतात लोणावळ्यातील मुसळधार पाऊस, दाट धुके, भुशी डॅम, तेथील उत्तुंग कडे, भन्नाट वारे, आकर्षित करणारी हिरवाई, पाण्याने तुडुंब भरलेली भातखाचरे, छोटे-मोठे धबधबे. पण, आता लोणावळा आणि मावळातील इतर भागातील वातावरणाचा आनंद उपभोगताना अनेक पर्यटकांना हुल्लडबाजांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर-धबधब्यांमध्ये बसून मद्यपान करणे, धिंगाणा-गोंधळ घालणे, छेडछाड करणे, बेदरकार वाहन चालविणे, त्यातून होणारे अपघात अशा गोष्टींमुळे हे ठिकाण शांत, सुसंस्कृत पर्यटकांसाठी उपद्र्रव ठरत चालले आहे. वाहतुकीची कोंडी व सुरक्षितता हे मुद्देसुद्धा यामुळे ऐरणीवर आले आहेत.
पावसाळी पर्यटन आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मावळला पसंती दिली जाते. येथील धो-धो पाऊस, जागोजागी निर्माण होणारे धबधबे, दाट धुके आणि हिरवाई यांमुळे या ठिकाणी पावसाळ्यात मोठी गर्दी होते. विशेषत: शनिवार, रविवार आणि इतर सुट्ट्यांच्या दिवशी या भागात अनेक जण हजेरी लावतात. यामध्ये कल्याण, ठाणे, मुंबई, पुणे येथून स्वत:ची वाहने घेऊन येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. पण, आता त्याचा ताबा विकृत पर्यटकांनी घेतला आहे. धांगडधिंगाच पाहायला मिळतो.
यातील अनेक पर्यटक मद्यपान करणे, गुटखा, तंबाखू यांची नशा करणे, मोठ्या आवाजात गाणी वाजवणे असे प्रकार करतात. तसेच, मद्यपान केल्यानंतर तिथेच बाटल्या फोडणे, त्या पाण्यात टाकणे, विचित्र हावभाव करणे, अश्लील नाच करणे, अशा अनेक गोष्टींचा त्रास स्थानिकांना, निसर्गप्रेमींना, तसेच मुख्यत: कुटुंबासह फिरायला आलेल्या पर्यटकांना सहन करावा लागतो.
>रोजगाराबरोबर त्रासही मिळाला
मद्यधुंद अवस्थेत पर्यटक वाहनांसमोर नाचत बसतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांची वाहने लवकर बाहेर पडत नाहीत. अनेकदा पर्यटक आणि वाहनचालक यांच्यात भांडणे होतात. मावळात येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला, पण त्यांचा त्रासही मोठा आहे. मद्यधुंद अवस्थेतील तरुण-तरुणींचा नाच, धांगडधिंगा न पाहण्याजोगा असतो. वाहनांची बेशिस्त, तरुणांची अरेरावी मावळातील नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे अशा हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
हुल्लडबाजी करीत वाहन चालवत असताना वडेश्वर गु्रप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच मधुकर मोरमारे यांना वाहनाचा धक्का लागला. त्यामुळे त्यांची पर्यटकांसोबत बाचाबाची झाली. याचा राग मनात धरून पर्यटकांनी त्यांना मारहाण केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.