किनारे पर्यटकांनी गजबजल.. पर्यटकांनी यावर्षी २५ हजारांचा टप्पा गाठला आहे.

By Admin | Updated: November 5, 2014 00:02 IST2014-11-04T21:42:29+5:302014-11-05T00:02:39+5:30

मालवणच्या पर्यटन हंगामाला सुरुवात

Tourists by the banks of the coast. Tourists have reached the stage of 25 thousand this year. | किनारे पर्यटकांनी गजबजल.. पर्यटकांनी यावर्षी २५ हजारांचा टप्पा गाठला आहे.

किनारे पर्यटकांनी गजबजल.. पर्यटकांनी यावर्षी २५ हजारांचा टप्पा गाठला आहे.

संदीप बोडवे - मालवणच्या पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. दिवाळीचा कालावधी असल्याने सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी अनेकांनी मालवणला भेट देणे पसंत केले आहे. दिवाळीत मालवणला येणाऱ्या पर्यटकांनी यावर्षी २५ हजारांचा टप्पा गाठला आहे. मालवणच्या सागरी पर्यटनाबाबत होत असलेल्या प्रसिद्धीमुळे पर्यटनात वाढ होत आहे. मालवणात समुद्राखालचे विश्व पर्यटकांसाठी खुले असल्यामुळे येथील किनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत.
ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यामुळे नावारूपास आलेले मालवणचे पर्यटन आता प्रगत सागरी पर्यटनासाठी ओळखले जावू लागले आहे. याठिकाणी सागरी पर्यटनासाठी पर्यटकांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. समुद्राखालचे विश्व पाहण्यासाठी पर्यटकांचा ओढा अधिक वाढला आहे. स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग करून पर्यटकांना डिस्कव्हरीसारख्या चॅनेलवर दाखविला जाणारा पाण्याखालचा थरार अनुभवता येत आहे.
दिवाळीपासून मालवणच्या पर्यटन हंगामाला सुरुवात होत असल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे तारकर्ली केंद्र सज्ज झालेले आहे. या कालावधीत एमटीडीसीची निवास व्यवस्था पूर्णत: फुल होती. पुढील पंधरा दिवसांसाठीचेही आगाऊ बुकींग करण्यात आले असल्याचे एमटीडीसीकडून सांगण्यात आले.
वाढत्या पर्यटनाबरोबरच मालवणमध्ये पर्यटकांना काही असुविधांचाही सामना करावा लागत आहे. बंदरजेटी, मालवण शहर तसेच तारकर्लीसारख्या पर्यटनस्थळी पर्यटकांना वाहनतळ नसल्यामुळे खासगी जागेत वाहने उभी करावी लागतात. यामुळे स्थानिक व पर्यटकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात. अरुंद रस्त्यांमुळेही वाहतुकीची कोंडी व अडचणींना पर्यटकांना सामोरे जावे लागत आहे.

मालवणच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांसाठी अनेक वॉटर स्पोटर््स उपलब्ध आहेत.
याठिकाणी पर्यटक वॉटर स्कूटर, जेट स्की, बनाना राईड, बंपर राईड, बॅक वॉटर बोटींग, पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग, स्नॉर्कलिंग, स्कुबा डायव्हिंग आदी आधुनिक आणि प्रगत सागरी पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात.

पायाभूत सुविधांचा अभाव
पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी चांगले रस्ते, माहिती फलक नसल्यामुळे पायाभूत सुविधांचा मात्र अभाव दिसत आहे.


हाऊस बोटींग
तारकर्ली खाडीत हाऊस बोटींगची मजा लुटण्यासाठी एमटीडीसीने हिरण्यकेशी, कर्ली आणि सावित्री अशा तीन निवासी पर्यटन बोटी उपलब्ध केल्या आहेत. हनिमून कपलसाठी या बोटी उत्तम आहेत. या बोटींना नवविवाहितांची अधिक पसंती मिळत आहे. या बोटींमधून खाडीत १० किलोमीटर बॅक वॉटर बोटींगही करता येवू शकते.

आकर्षक समुद्रकिनारे
देवबाग, तारकर्ली, वायरी, मालवण, चिवला बीच, तोंडवळी, तळाशिल, आचरा यासारखे सुंदर आकर्षक समुद्रकिनारे मालवणमध्ये पहावयास मिळतात. त्यामुळे येथील पर्यटनात वाढ होत आहे.
आकर्षण
रुपेरी वाळू, शांत आणि विस्तीर्ण असे हे किनारे आहेत.
याठिकाणी सागरी जैव विविधताही विपुल प्रमाणात आढळते.
त्यामुळे ही जैवविविधता येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.
दिवाळीपासून पर्यटन हंगामास सुरूवात झाल्याने मालवणात दररोज शेकडो पर्यटक सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देत आहेत.

Web Title: Tourists by the banks of the coast. Tourists have reached the stage of 25 thousand this year.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.