दौ-यावर दौरे; साध्य काहीच नाही

By Admin | Updated: October 27, 2014 02:40 IST2014-10-27T02:40:56+5:302014-10-27T02:40:56+5:30

अनेक वर्षे या समस्यांतून प्रवाशांची आणि एसटी महामंडळाची सुटका झालेली नाही. तरीही महामंडळाच्या अधिका-यांकडून परदेशात ‘अभ्यास दौरे’ होत आहेत.

Tour on tour; Nothing to accomplish | दौ-यावर दौरे; साध्य काहीच नाही

दौ-यावर दौरे; साध्य काहीच नाही

मुंबई : उशिराने धावणाऱ्या गाड्या, नादुरुस्त असलेल्या बसेस, हॉटेलमध्ये असलेल्या खाद्यपदार्थांचा खालावलेला दर्जा आणि टॉयलेटची झालेली दुरवस्था, असेच काहीसे चित्र सध्या एसटी महामंडळाच्या आगार आणि बस स्थानकांत दिसून येते.
अनेक वर्षे या समस्यांतून प्रवाशांची आणि एसटी महामंडळाची सुटका झालेली नाही. तरीही महामंडळाच्या अधिका-यांकडून परदेशात ‘अभ्यास दौरे’ होत आहेत. या वर्षभरातही दोन परदेश दौरे आणि देशात कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये दौरे होऊनही प्रवाशांच्या सुविधांत बदल झालेला नाही. त्यातच पुन्हा एकदा एसटीच्या अधिकाऱ्यांचा ब्राझील दौरा होत आहे.
केंद्राच्या एसआरटीयूतर्फे (असोसिएशन आॅफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग) भारतातील प्रत्येक राज्यातील एसटी महामंडळासाठी परदेशात अभ्यास दौरा आखला जातो. २0१४मध्ये २८ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत मॅक्सिको आणि सॅन फ्रॅन्सिस्को येथे अभ्यास दौरा काढला होता. तत्पूर्वी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचाही दौरा महामंडळातील अधिकाऱ्यांकडून केला गेला. प्रवासी आणि उत्पन्नवाढीसाठी उपाययोजना, इंधनाची बचत, सेवा आणि प्रवासी कराचा अभ्यास, आगार आणि बसची स्वच्छता, अपघातांना आळा घालण्यासाठी होणाऱ्या उपाययोजना कशा केल्या जाव्यात, यासाठी हे अभ्यास दौरे केले जात असल्याचे एसटी महामंडळ सातत्याने सांगते. गेल्या १० वर्षांपासून परदेश आणि देशभरात दौरे होत असून, प्रवाशांच्या सुविधांत कुठलाच बदल झाला नसल्याचे दिसून आले आहे. आता एसटी महामंडळाचे ५ अधिकारी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस ब्राझीलच्या दौऱ्यावर जात असून, यामध्ये वित्तीय सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी एकनाथ मोरे, वाहतूक - महाव्यवस्थापक विनोद रत्नपारखी, वरिष्ठ प्रोग्रामर - ईडीपी वीरेंद्र कदम, उपमहाव्यवस्थापक - प्रशिक्षण - (भोसरी) मिशा बंड, मुख्य अभियंता चालक आर. एम. पवनीकर यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Tour on tour; Nothing to accomplish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.