- मनीषा म्हात्रे मुंबई : मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणानंतर, नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या आपापसांतील भांडणात, बहुचर्चित कुश कटारिया हत्येचा दोषी आयुष पुगलिया या कैद्याची सोमवारी हत्या झाली. या घटनेमुळे खळबळ उडाली असतानाच, याच कारागृहातील २५ कैद्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली. गेल्या साडेतीन वर्षांत नागपूर मध्यवर्ती कारागृहातील ३२ कैद्यांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एकाने आत्महत्या केली आहे.भायखळा कारागृहातील वॉर्डन मंजुळा शेट्येची जेलर मनीषा पोखरकरसहीत सहा जणींनी निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर कारागृह प्रशासनाने आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. याबाबत उच्च न्यायालयाने कारागृह प्रशासनावर ताशेरे ओढले. या हत्येनंतर राज्यातील कैद्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, सोमवारी नागपूरमध्ये कैद्यांच्या आपापसांतील भांडणात आयुषची हत्या झाली. ही हत्या नियोजनबद्ध असल्याचे समजते.धक्कादायक बाब म्हणजे, नागपूर मध्यवर्ती कारागृहातील ३२ कैद्यांचा फेब्रुवारी २०१४ ते ५ जुलै २०१७ दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.यापैकी २५ कैद्यांच्या मृत्यूबाबतचे गूढ कायम आहे. उर्वरित ७ कैद्यांपैकी रोहित बिंदुसार बनसोड या कैद्याने आत्महत्या केल्याची नोंद आहे. २ सप्टेंबर २०१४ मध्ये त्याने कारागृहात आत्महत्या केली होती, तर दोन कैद्यांच्या नैसर्गिक मृत्यूसह तिघांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची नोंद कारागृह प्रशासनाच्या दफ्तरी आहे. पुगलियाच्या हत्येनंतर कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.वर्षानुवर्षे आकडा चढाच...नागपूर कारागृहात वर्षानुवर्षे कैद्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे आकडेवारीतून समोर आले. या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांत ३ कैद्यांचा मृत्यू झाला आहे, तर साडेतीन वर्षांपैकी गेल्या वर्षी सर्वाधिक कैद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांना माहिती अधिकारातून मिळाली. नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीत, २०१६ मध्ये १३, २०१५ मध्ये ९, २०१४ मध्ये ७ तर जुलै २०१७ पर्यंत ३ कैद्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.कैद्यांच्या मृत्यूबाबत चौकशी सुरू असल्याने, त्यांचे मृत्यूचे कारण प्रलंबित आहेत. नियमानुसार चौकशी सुरू असून, शवविच्छेदनाच्या अंतिम अहवालानंतर नेमके कारण समजू शकेल, त्यावर आता बोलणे योग्य नाही.- राणी भोसले, अधीक्षक,नागपूर मध्यवर्ती कारागृह
नागपूर कारागृहात साडेतीन वर्षांत एकूण ३२ कैद्यांचा मृत्यू, २५ कैद्यांचा मृत्य संशयास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 04:40 IST