बेस्ट संकटावरील उताराच अडचणीत
By Admin | Updated: April 4, 2017 03:01 IST2017-04-04T03:01:34+5:302017-04-04T03:01:34+5:30
आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बेस्ट उपक्रमाला महापालिकेने हात देण्याचे कबूल केल्यामुळे कृती आराखडा प्रशासनाने तयार केला

बेस्ट संकटावरील उताराच अडचणीत
मुंबई : आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बेस्ट उपक्रमाला महापालिकेने हात देण्याचे कबूल केल्यामुळे कृती आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. मात्र यामध्ये महापालिकेने सुचविलेली स्वेच्छानिृवत्ती, बसगाड्या कमी करणे आणि बेस्ट भाडेवाढ अशा जालीम उपायांचा समावेश आहे. त्यामुळे हा आराखडा अमलात येण्यापूर्वीच अडचणीत येणार आहे.
कोट्यवधी रुपयांच्या तुटीत असलेल्या बेस्ट उपक्रमाला टाळे लागण्याची वेळ आली आहे. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी बेस्टने अखेर महापालिकेपुढे हात पसरले आहेत. पालिका प्रशासनानेही या सार्वजनिक उपक्रमाच्या पालकत्वाची जबाबदारी घेतली आहे. मात्र आर्थिक मदतीपूर्वी यावर बेस्टकडून अहवाल मागविण्यात आला होता. हा अहवाल तयार असून गुरुवारी बेस्ट समितीच्या बैठकीत यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
यामध्ये बसभाड्यात दोन ते चार रुपयांमध्ये वाढ, पांढरा हत्ती ठरणाऱ्या वातानुकूलित २८४ बसगाड्या बंद करणे, वाहनचालक व वाहक वगळता नोकर भरती बंद आणि स्वेच्छा अथवा सक्तीची निवृत्ती असे उपाय या अहवालातून पुढे आले आहेत. मात्र कामगार कपातीला कामगार संघटनांकडून तीव्र विरोध होणार हे निश्चित आहे. तसेच भाडेवाढ बेस्टलाच घातक ठरू शकते. त्यामुळे या शिफारशींवर आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
वातानुकूलित बसगाड्या बंद
वातानुकूलित बसगाड्या बेस्टसाठी केवळ पांढरा हत्तीच ठरल्या आहेत. या बसगाड्यांच्या उत्पन्नापेक्षा त्यावरील खर्चच अधिक आहे. दरवर्षी या सेवेतून बेस्ट उपक्रमाचे ८२ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. ही बाब वारंवार निदर्शनास आणूनही केवळ प्रतिष्ठेसाठी बेस्टने या बसगाड्या बंद केल्या नाहीत. यामुळे आर्थिक तूट वाढत गेली. आता या २८४ वातानुकूलित बसगाड्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे.
भाडेवाढ म्हणजे पायावर धोंडा : बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून पाच ते सात वर्षांपूर्वी ४२ लाख प्रवासी प्रवास करत होते. ही संख्या आता २९ लाखांवर आली आहे. दोन वर्षांपूर्वीच बेस्ट उपक्रमाने तीन वेळा भाडेवाढ केली होती. त्यातच मेट्रो रेल्वेचे जाळे वाढत आहे. शेअर रिक्षा-टॅक्सीचे आव्हान, ओला व उबेरची स्पर्धा यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येवर परिणाम होत आहे. अशात आणखी भाडेवाढ बेस्ट उपक्रमाला मुंबईकरांपासून तोडू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. सध्या तिकिटांचा किमान दर आठ रुपये आहे, तो दहा रुपये करण्याचे प्रस्तावित आहे.
वातानुकूलित बसगाड्यांचा सोस सुटत नाही
वातानुकूलित बसगाड्या बंद करण्याचे ठरविले तरी अद्याप या बसगाड्यांचा बेस्टचा सोस काही सुटलेला नाही. त्यामुळे २५ कोटी खर्च करून वातानुकूलित मिनी बसगाड्या खरेदी करणे प्रस्तावित आहे.
या वर्षभरात १५८७ कामगार निवृत्त होणार आहेत. मात्र वाहनचालक व वाहक वगळता नोकरभरती करण्यात येणार नाही.