‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’चे उद्या प्रकाशन
By Admin | Updated: November 17, 2014 23:24 IST2014-11-17T23:04:29+5:302014-11-17T23:24:58+5:30
कॉफी टेबल बुक : खासदार विजय दर्डा, अभिनेता अजय देवगण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’चे उद्या प्रकाशन
कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रातील सर्वांगीण प्रगतीच्या कार्यात मोलाची कामगिरी करत त्या-त्या क्षेत्रांत विकासाचे मानदंड ठरलेल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख शब्दबद्ध असलेल्या ‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन बुधवारी (दि. १९) सकाळी साडेदहा वाजता ‘लोकमत भवन’ प्लॉट क्रमांक डी-३७, शिरोली औद्योगिक वसाहत येथे एका शानदार समारंभात होत आहे. दक्षिण महाराष्ट्रातील अभिनव अशा या कॉफी टेबल बुकचा प्रकाशन सोहळा ख्यातनाम अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता अजय देवगण यांच्या हस्ते होईल. भव्यदिव्य अशा या सोहळ्यास श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा उपस्थित राहणार आहेत. ‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’ कॉफी टेबल बुक म्हणजे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा उचित असा गौरव तर असेलच, शिवाय येथून पुढच्या विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या भावी पिढीला दिशादर्शकही ठरेल. या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक ‘डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, कोल्हापूर’ असून सहप्रायोजक ‘बिग ड्रीम’ हे आहेत.
कोल्हापूर, सांगली, सातारा हा दक्षिण महाराष्ट्र क्रांतिकारकांचा परिसर. स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक यशस्वी सामाजिक चळवळी या परिसरातच झाल्या. स्वातंत्र्यानंतरच्या काळातही स्वकर्तृत्वाच्या आधारे सहकाराच्या माध्यमातून समाजाचा सर्वांगीण विकास करण्यातही अर्थात याच परिसराने पुढाकार घेतला. तसेच अनेक क्षेत्रांना मार्गदर्शकाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. राज्य व केंद्र सरकारला आपली धोरणे ठरविण्यास भाग पाडले. अशा या कर्तृत्ववान, बौद्धिक, वैचारिक तसेच औद्योगिक विचारांचा समृद्ध वारसा लाभलेल्या परिसरात अनेक नररत्नांनी जन्म घेतला. त्यांनी आपल्यातील बौद्धिक क्षमतेच्या जोरावर आणि कृतीतून हा वारसा जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला.अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा समग्र आलेख कॉफी टेबल बुक अर्थात ‘आयकॉन्स आॅफ साऊ थ महाराष्ट्र’च्या माध्यमातून समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर हस्तींचा त्यात समावेश आहे. या बड्या हस्तींनी केवळ आपले उद्योगच विस्तारले नाहीत तर समाजाच्या विकासाच्या कक्षाही विस्तारल्या आहेत. समाजात आर्थिक सुबत्ता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. एक सुसंस्कृत पिढी तयार करण्याचे काम केले. विकासाभिमुख समाज उभारण्याचे काम केले वरवर हे काम सहज सोपे वाटत असले तरी अतिशय अवघड असेच आहे. अशा या जिद्दी, प्रयोगशील आणि व्रतस्थ अशा व्यक्तिमत्त्वांचा गौरवच या ‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’ या बुकच्या माध्यमातून ‘लोकमत’ने केला आहे. ‘आयकॉन्स आॅफ साऊथ महाराष्ट्र’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही तितकाच दिमाखदार, भव्य-दिव्य स्वरूपात तसेच सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. शिरोली औद्योगिक वसाहतीमधील ‘लोकमत भवन’ येथे होणार आहे. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी आहे. (प्रतिनिधी)