डॉक्टरांच्या जामिनाचा निकाल लागणार उद्या
By Admin | Updated: August 17, 2016 04:15 IST2016-08-17T04:15:43+5:302016-08-17T04:15:43+5:30
किडनी रॅकेट प्रकरणी जुलैमध्ये अटक करण्यात आलेल्या पाच जणांनी केलेल्या जामीन अर्जावरील निर्णय अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी १८ आॅगस्टपर्यंत राखून ठेवला.

डॉक्टरांच्या जामिनाचा निकाल लागणार उद्या
मुंबई : किडनी रॅकेट प्रकरणी जुलैमध्ये अटक करण्यात आलेल्या पाच जणांनी केलेल्या जामीन अर्जावरील निर्णय अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी १८ आॅगस्टपर्यंत राखून ठेवला.
हिरानंदानी रुग्णालयाचे सीईओ डॉ. सुजी चॅटर्जी, अनुराग नाईक, मुकेश शेट्टे, मुकेश शहा आणि प्रकाशचंद्र शेट्ट्ये यांना पोलिसांनी प्रत्यारोपण कायद्यांतर्गत १४ जुलै रोजी अटक केली. त्यांनी मंगळवारी जामीन अर्ज केला.
निरपराध डॉक्टरांना तुरुंगात ठेवण्यात आले आहे. डॉ. प्रकाश शेट्टी यांना लग्नानंतर १७ वर्षांनी जुळ्या मुली झाल्या आहेत. त्यांना मानवतेच्या आधारावर सोडण्यात यावे.
डॉ. मुकेश शहा यांनी अवयव प्रत्यारोपणाच्या ५० हून अधिक शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत. ते गुन्हा करणे शक्य नाही, असा युक्तिवाद डॉक्टरांच्या वतीने अॅड. आबाद पौडा यांनी केला. आरोपी पुरावे नष्ट करतील, अशी भीती सरकारी वकिलांनी व्यक्त केली. दंडाधिकाऱ्यांनी १८ आॅगस्टला निकाल देऊ, असे स्पष्ट केले.
नीलेश कांबळेसह सरकारी डॉक्टरची पुन्हा चौकशी
मुंबई : हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेट प्रकरणी प्रत्यारोपण समन्वयक नीलेश कांबळेसह एका सरकारी डॉक्टरची मंगळवारी आरोग्य खात्याच्या चौकशी समितीने पुन्हा एकदा चौकशी केली. या चौकशीत त्यांच्या जबाबात तफावत आढळल्याने या प्रकरणात आणखीन काही घटना उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या प्रकरणी राज्य सरकारने आरोग्य सेवा संचालनालयातील तीन तज्ज्ञ डॉक्टरांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीने यापूर्वी प्रत्यारोपण समन्वयक तसेच किडनी प्रत्यारोपणासाठी आलेला रुग्ण व महिलेची तसेच हिरानंदानी रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी केली आहे. या चौकशी समितीच्या अहवालानुसार रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पाच डॉक्टरांना अटक करण्यात आली. शिवाय या प्रकरणात आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील किडनी प्रत्यारोपण समन्वयक नीलेश कांबळेसह अन्य डॉक्टरांची पुन्हा नव्याने चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीत दोघांच्या जबाबात तफावत आढळून येत आहे. त्यामुळे त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. पूर्वीचा जबाब आणि आताचा जबाब तपासण्यात येत असल्याची माहिती चौकशी समितीने दिली. या चौकशीचा अहवाल येत्या दोन दिवसांत आरोग्य संचालक डॉ. मोहन जाधव यांना सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.