टोमॅटोपाठोपाठ कांद्यानेही रडविले!
By Admin | Updated: August 29, 2016 03:31 IST2016-08-29T03:31:59+5:302016-08-29T03:31:59+5:30
निकृष्ट बियानांमुळे टोमॅटो हंगाम हातातून गेल्यानंतर आर्थिक गर्तेत सापडलेल्या बळीराजाला कांदापिक तरी वर काढेल, अशा आशेवर बसलेल्या उत्पादकांच्या डोळयात सध्या कांद्याने पाणी आणले आहे.

टोमॅटोपाठोपाठ कांद्यानेही रडविले!
ओझर / निरगुडसर : निकृष्ट बियानांमुळे टोमॅटो हंगाम हातातून गेल्यानंतर आर्थिक गर्तेत सापडलेल्या बळीराजाला कांदापिक तरी वर काढेल, अशा आशेवर बसलेल्या उत्पादकांच्या डोळयात सध्या कांद्याने पाणी आणले आहे. किलोला ५ ते ७ रुपये इतका कमी बाजारभाव मिळत असल्याने त्यातून भांडवलही निघत नसल्याने आता कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात कांदापिक मोठ्या प्रमाणावर घेतले होते़ त्यामध्ये आंबेगाव तालुक्यासह शिरूर, खेड, जुन्नर या तालुक्यांचाही समावेश आहे़ कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी ३५ ते ४० हजार रुपये एकरी खर्च करून शेतात कांदापिक घेतले होते़
पोषक हवामानामुळे उत्पादनही चांगल्या प्रमाणात झाले़ त्या वेळी कांद्याला ७० ते ८० रुपये दहा किलोसाठी बाजारभाव मिळत होता़ हा बाजारभाव केलेल्या खर्चाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना परवडणारा नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी भविष्यात चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने कांदाचाळी बांधून कांद्याची साठवणूक केली़
लाखो रुपये खर्च करून कांदाचाळी बांधल्या, कांद्याचे भांडवल अधिक कांदाचाळींचा खर्च, मंजुरी सर्व खर्च अंगावर पडून आहे. शासनाकडून मिळणाऱ्या कांदाचाळींचे अनुदानदेखील मिळालेले नाही़ त्यामुळे कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे़
कांदापिकासाठी बँका, सोसायट्या यांचे कर्ज काढून केलेला भांडवली खर्चदेखील सध्याच्या दरात वसूल होत नाही. पाच महिने बराकीत कांदा साठवून ठेवला. त्यामधील बराचसा कांदा सडला, वजन घट झाली. तरीही कांद्याचे दर वाढतच नसल्यामुळे खर्च केलेले भांडवलदेखील सध्या वसूल होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा अधिकच वाढला आहे.
उन्हाळी हंगामात टोमॅटोची पिके घेतली. परंतु या पिकाला करपा, बोकड्या या रोगाच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटोचा भांडवली खर्चदेखील वसूल झाला नाही. (प्रतिनिधी)
भाव आणखी कमी होणार
या वर्षी कांद्याचे दर वाढण्याची शक्यता धूसर असल्याची शक्यता ओतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे अडतदार प्रदीप मुरादे, धनेश संचेती (जुन्नर) यांनी सांगितले. साठवणगृहात सडत चाललेला कांदा, तसेच भविष्यात कांद्याचे दर वाढणार नाहीत, या शक्यतेने भीतीपोटी जुन्नर, ओतूर, तसेच ओतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर अधिक ढासळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांच्या अडतीचा तिढा निर्माण केल्यामुळे अडतदार व्यापारी व शेतमाल खरेदीदार व्यापारी यांच्यामधील साट्यालोट्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची विक्री कचरामोल भावात होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याची खंत पिंपळगाव सिद्धनाथ येथील प्रगतिशील शेतकरी संदेश खंडागळे, संतोष खंडागळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.