टमाटर, कोथिंबीर, मिरची @ १००!
By Admin | Updated: August 7, 2014 00:58 IST2014-08-07T00:58:27+5:302014-08-07T00:58:27+5:30
उशिरा आलेल्या जोरदार पावसामुळे भाज्या खराब झाल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. टमाटर आणि कोथिंबीरने स्वयंपाकघरातून एक्झिट घेतली आहे.

टमाटर, कोथिंबीर, मिरची @ १००!
भाज्या ‘तिखट’ : गृहिणींचे बजेट बिघडले
नागपूर : उशिरा आलेल्या जोरदार पावसामुळे भाज्या खराब झाल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. टमाटर आणि कोथिंबीरने स्वयंपाकघरातून एक्झिट घेतली आहे. किरकोळ बाजारात तिन्ही भाज्या प्रति किलो १०० रुपयांवर आहेत. एकंदरीत भाज्या ‘तिखट’ झाल्या आहेत.
टमाटरची आवक घटली असून कडक भाव आणखी काही दिवस राहतील. महागाईची झळ सर्वसामान्यांना बसत असून दरदिवशी जीवनावश्यक वस्तू महाग होत आहेत. भाज्यांच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींच्या बजेटमध्ये वाढ झाली आहे.
नवीन लागवड आॅगस्टपासून सुरू झाली असून नवीन माल बाजारात येईपर्यंत ग्राहकांना भाज्या महागच मिळतील. केवळ वांगे, पत्ताकोबी, पालक, कोहळे या भाज्यांचे दर आटोक्यात असून बहुतांश भाज्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे.
स्वयंपाकघरात कडधान्याचा वापर होऊ लागला आहे. आवक कमी असल्याने किरकोळच नव्हे तर ठोक बाजारातही भाज्या महाग असल्याची माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतला दिली.
स्थानिक व बाहेरून आवक कमी
कॉटन मार्केट ठोक बाजारात टमाटर नारायणगाव, मगनफल्ली, संगमनेर व नाशिकहून येत आहे.
गोंदिया आणि भंडाऱ्यातून भेंडी, छिंदवाडा व औरंगाबाद येथून फुलकोबी आणि परतवाडा, जगदलपूर, रायपूर येथून हिरव्या मिरचीची आवक आहे. नागपूरलगतच्या परिसरातून चवळी भाजी, पालक, भेंडी, कारले आदींची आवक आहे. कॉटन मार्केटमध्ये लहानमोठ्या १५० गाड्या येत आहेत. या बाजारातून अन्य ठिकाणी भाज्या विक्रीसाठी जात असल्याने सध्या भाज्यांचा तुटवडा जाणवत असल्याचे अडतियांनी सांगितले.