टोल, कर रद्द करा
By Admin | Updated: November 21, 2014 02:34 IST2014-11-21T02:34:56+5:302014-11-21T02:34:56+5:30
सटीला आर्थिक संकटात सापडण्यास अनेक कारणे असून यात टोल आणि प्रवासी करामुळे मोठा फटका बसत आहे. त्यामुळे टोल आणि

टोल, कर रद्द करा
मुंबई : एसटीला आर्थिक संकटात सापडण्यास अनेक कारणे असून यात टोल आणि प्रवासी करामुळे मोठा फटका बसत आहे. त्यामुळे टोल आणि प्रवासी कर रद्द करावा, अशी मागणी अनेक वेळा एसटी महामंडळाकडून शासनाकडे करण्यात आली आहे. आता एसटी महामंडळाने हीच मागणी नव्या सरकारकडे लावून धरली असून तसे एक मागणीपत्रही पाठविले आहे.
२00८-0९ साली एसटी महामंडळाकडून तब्बल ६0 कोटी ९७ लाख रुपये टोल टॅक्सचे भरण्यात आले होते. तर २00९-१0 साली हाच आकडा ६८ कोटी ६३ लाख रुपये एवढा होता. २0१३-२0१४ साली तर हाच आकडा जवळपास १२0 कोटी रुपये एवढा झाला आहे. टोल टॅक्सचा भार वाढतच जात असल्यामुळे महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. त्याचबरोबर प्रवासी सेवेवर १७.५ टक्के तर शहरी भागातील प्रवासी सेवेवर ३.५ टक्के प्रवासी कर आकारला जातो. या कराचाही फटका एसटीला बसतो. त्यामुळे हे दोन्ही कर रद्द करण्यात यावे, अशी मागणी एसटी महामंडळाकडून राज्य सरकारकडे करण्यात येत होती. मात्र त्यावर निर्णय होत नव्हता. महत्त्वाची बाब म्हणजे शासनाच्या विविध विभागांना देण्यात येणाऱ्या सवलतींमुळेही महामंडळावर शेकडो कोटींचा बोजा पडत आहे. त्यामुळे या सवलतींवरही विचार केला जावा, अशी मागणीही होत होती. अखेर नवीन सरकार स्थापन होताच एसटी महामंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे टोल, प्रवासी कर रद्द करण्याबरोबरच सवलतींचाही विचार करावा, अशी लेखी मागणी केल्याचे एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)