टोल पूर्णपणे बंद होणं शक्य नाही - गडकरी
By Admin | Updated: May 21, 2015 12:18 IST2015-05-21T11:46:51+5:302015-05-21T12:18:14+5:30
निवडणुकीदरम्यान टोल बंद करण्याचे आश्वासन देणा-या नितीन गडकरी यांनी 'टोल पूर्णपणे बंद होऊ शकत नाही' असे सांगत या मुद्यावरून चक्क यू-टर्न घेतला आहे.

टोल पूर्णपणे बंद होणं शक्य नाही - गडकरी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - निवडणुकीदरम्यान टोल बंद करण्याचे आश्वासन देणा-या नितीन गडकरी यांनी 'टोल पूर्णपणे बंद होऊ शकत नाही' असे सांगत या मुद्यावरून चक्क यू-टर्न घेतला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या गडकरींनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केल्याने सरकारने घूमजाव केल्याचे स्पष्ट झाले आहे.
'जनतेला चांगले रस्त हवे असतील तर टोल राहणारच' असे सांगत टोल पूर्णपणे बंद होणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. याच गडकरींनी विधानसभा निवडणुक प्रचारादरम्यान 'आपण टोलचा खेळ सुरू केला होता आणि आता आपणच तो बंद करू' असे आश्वासन देत जनतेला गाजर दाखवलं होतंं. मात्र सरकार सत्तेवर येऊन अवघे वर्ष पूर्ण होते न होते तोच त्यांनी आपल्या विधानावरून पलटी मारली आहे.
भाजपात लोकशाही आहे
केंद्रात मोदी, अमित शाह आणि जेटली हे तिघेच सरकार चालवत आहेत, बाकीच्या ज्येष्ठ मंत्र्यांचे मत विचारात घेतले जात नाही, असे सरकारवर होत असलेले आरोप चुकीचे असून भाजपामध्ये लोकशाहीच आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. भाजपात फक्त तिघांचेच सरकार नाही, पंतप्रधान मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करून मगच निर्णय घेतात, असेही त्यांनी सांगितले.