टोलप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत उद्या बैठक

By Admin | Updated: May 22, 2015 00:48 IST2015-05-22T00:48:34+5:302015-05-22T00:48:37+5:30

सरकारचे चर्चेचे निमंत्रण : टोलविरोधी कृती समितीने स्वीकारले

TOL questions meet tomorrow with Chief Minister | टोलप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत उद्या बैठक

टोलप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत उद्या बैठक

कोल्हापूर : शहरांतर्गत आकारल्या जाणाऱ्या टोलला राज्य सरकारने सुचविलेला पर्याय स्पष्टपणे फेटाळून लावल्यानंतरही सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीसोबत चर्चा करण्यास राज्य सरकारची तयारी आहे. यासंदर्भात चर्चेतून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी कोल्हापुरात बैठक बोलावली असून चर्चेचे निमंत्रण कृती समितीनेही स्वीकारले आहे.
शनिवारी दुपारी चार वाजता राम गणेश गडकरी सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि सर्वपक्षीय कृती समितीचे २० निवडक सदस्य यांच्यात बैठक होणार आहे. चर्चेतून काय मार्ग निघणार आहे यावर पुढील दिशा ठरविली जाईल. जर सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला नाही तर त्याच दिवशी त्याच ठिकाणी आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे कृती समितीतर्फे सांगण्यात आले.
कृती समितीचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी पत्रकारांना सांगितले की, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा बुधवारी सायंकाळी मला फोन आला. त्यावेळी त्यांनी शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची कृती समितीसोबत चर्चा करण्याची तयारी आहे, असा निरोप सांगितला; परंतु चर्चेला जायचे की नाही, यावर कृती समितीतील सर्व सदस्यांशी सल्लामसलत करूनच काय ते सांगतो, असे त्यांना उलट निरोप दिला. बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी कृती समितीच्या सर्वच घटक पक्षांशी चर्चा केल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन चर्चेला जाण्याचा निर्णय घेतला. ‘चर्चेतून मार्ग निघतो,’ ही आमची भावना आहे. त्यामुळे आम्ही शनिवारी चर्चेला जाणार आहोत शिवाय आम्हाला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही. (पान १० वर)
प्रा. पाटील यांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी सरकारच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘एम एच ०९’ वाहने वगळण्याचा पर्याय आम्हाला सांगितला होता परंतु आम्ही तो नाकारला आहे. आता सरकार आणखी पुढे जाऊन मोठी वाहने तसेच मालक कोल्हापूरचा आणि वाहन बाहेर जिल्ह्यातील आहेत अशांनाही वगळण्याचा पर्याय सांगितला आहे परंतु आमचं तर म्हणणे असं आहे की, कोल्हापूरमध्ये आयआरबीचा एकही टोलनाका राहता कामा नये. चर्चेला आम्ही जाऊ पण विनापर्याय टोल रद्द, ही आमची मागणी कायम राहील.

टोल कायमचा घालविणे हीच सरकारची भूमिका आहे. सर्वाेच्च न्यायालयाने टोलवसुलीस दिलेली स्थगिती उठविल्याने टोलविरोधी कृती समितीच्या मागणीनुसार टोलवसुलीस सरकारने स्थगिती दिल्यास तो न्यायालयाचा अवमान होईल.
- चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री

सरकारसोबत चर्चेला जातोय याचा अर्थ आम्ही टोलचा कोणताही पर्याय स्वीकारलेला नाही अथवा स्वीकारणारही नाही. कोल्हापुरातून सर्व टोलनाके उचलून नेले पाहिजेत यावर आम्ही अद्यापही ठाम आहोत.
- प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते


मुश्रीफ, तुम्ही कोणाला विकले गेला ते आधी पहा
माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी बुधवारी सर्वपक्षीय कृती समितीवर टीका केली होती. त्यासंदर्भात विचारणा केली असता प्रा. एन. डी. पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला.


आम्ही कोणालाच विकलो गेलेलो नाही, पण हसन मुश्रीफ तुम्ही कोणाला विकला गेला आहात, ते आधी तपासून पाहा, अशा जहाल शब्दांत प्रा. पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावर टीका केली.

ते म्हणाले, आमच्या आंदोलनावर शेरेबाजी करणाऱ्या हसन मुश्रीफ यांचा आमच्या लोकआंदोलनात सहभाग काय होता? त्यांच्या मेहरबानीवर आमचे आंदोलन सुरू नाही. त्यामुळे त्यांना शेरेबाजी करण्याचा अधिकार नाही.
नदीच्या काठावर बसायचे आणि पाण्यात बुडणाऱ्याला आत्मविश्वास गमावू नका, हात-पाय हलवा, म्हणून सांगण्यातील हा प्रकार आहे. आम्ही पाण्यात पडलोय तर कसे पोहायचे हे आम्हाला चांगले ठावूक आहे. मुश्रीफांनी आम्हाला सांगायची गरज नाही, असले फुकटचे सल्ले देणारे सल्लागार आम्हाला नको आहेत.
पंचगंगा नदीत टोल बुडविण्याचे मुश्रीफ यांनीही आम्हाला आश्वासन दिले होते. पण नदीही आणि टोलनाकेही जिथल्या तिथेच आहेत. सतेज पाटील यांनी सहज गंमत म्हणून टोलची पावती फाडली. त्यादिवशी त्यांना बरं वाटलं, पण जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीच आहे, असे पाटील म्हणाले.

Web Title: TOL questions meet tomorrow with Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.