रामदेवबाबा विरुद्ध तोगडिया संघर्ष?
By Admin | Updated: July 10, 2016 04:38 IST2016-07-10T04:38:13+5:302016-07-10T04:38:13+5:30
जहाल भूमिकेमुळे चर्चेत राहणारे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष व नामांकित कर्करोग सर्जन डॉ. प्रवीण तोगडिया यांनी व्यसने सोडविणारी औषधे बाजारात आणली आहेत.

रामदेवबाबा विरुद्ध तोगडिया संघर्ष?
- योगेश पांडे, नागपूर
जहाल भूमिकेमुळे चर्चेत राहणारे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष व नामांकित कर्करोग सर्जन डॉ. प्रवीण तोगडिया यांनी व्यसने सोडविणारी औषधे बाजारात आणली आहेत. संघभूमीतूनच शनिवारी त्यांनी याची घोषणा केली. संघ परिवारातील एक वर्ग रामदेव यांच्या वर्चस्वामुळे नाराज आहे. तोगडियांचे हे पाऊल म्हणजे रामदेवबाबांच्या औषधी उत्पादनांना थेट टक्कर मानण्यात येत आहे.
तंबाखू, मद्य व अमलीपदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य खराब होत आहे. सोबतच देशात ‘शुगर’चे आजार वाढत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन डॉ. तोगडिया यांनी ‘इंडिया हेल्थ लाइन’ या उपक्रमाच्या माध्यमातून तीन औषधे बाजारात आणली आहेत. सोबतच रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणारे ‘किट’देखील स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
रामदेवबाबांनी विविध औषधे आणली आहेत. त्याचे ‘मार्केटिंग’ जोरात सुरू आहे. तोगडिया यांच्या औषधांमुळे रामदेवबाबांना आव्हान निर्माण झाले आहे. विहिंपने आरोग्य उपक्रमांवर भर दिला आहे. ‘आनंदी राष्ट्र, आरोग्यदायी राष्ट्र’ या संकल्पनेवर ‘इंडियन हेल्थ लाइन’द्वारे ‘आरोग्यदूत’ ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे.
मार्केटिंगसाठी संत
लोकांना व्यसनमुक्त करण्याचा उपक्रम जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी साधू-संतांची मदत घेण्यात येईल. २० हजार साधू-संतांना पत्र पाठविण्यात येईल, असे तोगडिया म्हणाले. सर्व धर्मगुरूंची मदत घेणार का अशी विचारणा केली असता, सहकार्य केवळ हिंदूंचेच घेणार. सेवा सर्वांसाठी खुली असेल, असे डॉ. तोगडिया यांनी स्पष्ट केले.