राहूल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याचा आज निर्णय
By Admin | Updated: March 10, 2015 04:21 IST2015-03-10T04:21:28+5:302015-03-10T04:21:28+5:30
महात्मा गांधी यांची हत्या आरएसएसने केली, या वक्तव्याप्रकरणी भिवंडी येथे दाखल असलेला गुन्हा रद्द करण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहूल

राहूल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याचा आज निर्णय
मुंबई : महात्मा गांधी यांची हत्या आरएसएसने केली, या वक्तव्याप्रकरणी भिवंडी येथे दाखल असलेला गुन्हा रद्द करण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय उद्या मंगळवारी निकाल देणार आहे़ गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार राहूल यांनी हे वक्तव्य केले़ याप्रकरणी संघाने भिवंडी येथे याचा गुन्हा दाखल केला़ हा गुन्हा रद्द करण्यासाठी राहूल यांनी न्यायालयात याचिका केली आहे़
या याचिकेवर न्या़ एम़ एल़ ताहिलयानी यांच्यासमोर सुनावणी झाली़ महात्मा गांधी यांची हत्या संघाने केली की नाही यावर भिन्न मत प्रवाह आहे़ यावर पुस्तकेही लिहिली गेली आहेत़ आणि प्रचार करताना जनतेसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट करणे हे माझे काम आहे़ त्यामुळे ही तक्रार हेतूपूरस्सर करण्यात आली असल्याने ती रद्द करावी, अशी मागणी राहूल यांच्यावतीने करण्यात आली़
मात्र महात्मा गांधी यांची हत्या संघानेच केली असल्याचा दावा राहूल यांनी भाषणात केला होता़ संघाने देशभरात याच्या तक्रारी केल्या नाहीत़ तसेच सुनावणी न्यायालयापुढे राहूल यांनी आपली बाजू मांडावी़ असा युक्तिवाद संघाच्यावतीने करण्यात आला़उभय पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर निकाल राखून ठेवला़