म्हाडाच्या १ हजार घरांसाठी आज जाहिरात
By Admin | Updated: April 13, 2015 05:48 IST2015-04-13T05:48:37+5:302015-04-13T05:48:37+5:30
म्हाडाच्या यंदाच्या घराच्या सोडतीसाठी अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे. मुंबईतील ९९७ घरांसाठी सोमवारी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे

म्हाडाच्या १ हजार घरांसाठी आज जाहिरात
मुंबई : म्हाडाच्या यंदाच्या घराच्या सोडतीसाठी अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे. मुंबईतील ९९७ घरांसाठी सोमवारी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित राहिलेल्या अंध व अपंग प्रवर्गासाठी आरक्षित ६६ घरांच्या लॉटरीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. येत्या बुधवारपासून म्हाडाच्या संकेतस्थळावर इच्छुकांना अर्जासाठी नोंदणी करता येणार असून, त्यानंतर २१ एप्रिलपासून आॅनलाइन अर्ज भरता येतील.
काँग्रेस सरकारच्या काळात म्हाडातील घरांच्या किमतीबाबत ओरड करणारी भाजपा-शिवसेना आपल्याकडे सत्ता असतानाही घराच्या वाढीव किमतीवर नियंत्रण ठेवू शकलेली नाही. उलट गेल्या वेळीपेक्षा यंदा सर्वच उत्पन्न गटातील सदनिका महागड्या आहेत. प्रतीक्षानगरातील ४०.६० चौरस मीटर घरासाठी ३७ लाख ५३ हजार तर गोरेगाव उन्नतनगरातील अत्यल्प उत्पन्न गटासाठीच्या २५ चौरस मीटरच्या घरासाठी १८ लाख १४ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
सुरुवातीला सदनिकेच्या दर निश्चितीच्या गोंधळामुळे आणि त्यानंतर वांद्रे पोटनिवणुकीसाठीच्या आचारसंहितेमुळे लॉटरीची जाहिरात रेंगाळली होती. शनिवारी मतदान झाल्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याचा मार्ग मोकळा झाला. कोकण मंडळाच्या विरारमधील घरांसाठी मात्र डिसेंबरमध्ये स्वतंत्रपणे सोडत घेतली जाणार असल्याचे प्राधिकरणातील सूत्रांकडून सांगण्यात आले. या वर्षीच्या लॉटरीत उच्च उत्पन्न गटातील घरांचा समावेश न करता अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटातील घरांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यासाठी मासिक उत्पन्नाची अट अनुक्रमे १६ हजार, ४० व ७० हजार इतकी आहे.
याबाबतची सविस्तर माहिती प्राधिकरणाच्या ६६६. www.mhada.maharashtra.gov.in, www.mhada.gov.in, https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळांवर १५ एप्रिलपासून पाहावयास मिळणार आहे.