चोळेतील गावदेवीची यात्रा आजपासून
By Admin | Updated: May 21, 2016 03:55 IST2016-05-21T03:55:47+5:302016-05-21T03:55:47+5:30
ठाकुर्लीतील चोळे गावातील गावदेवीच्या यात्रेला शनिवार, २१ मेपासून प्रारंभ होत आहे.

चोळेतील गावदेवीची यात्रा आजपासून
डोंबिवली : ठाकुर्लीतील चोळे गावातील गावदेवीच्या यात्रेला शनिवार, २१ मेपासून प्रारंभ होत आहे. ही यात्रा दोन दिवसांची असते. दर तीन वर्षांनी भरणाऱ्या या यात्रेची गावकरी आतुरतेने वाट पाहत असतात. उद्यापासून देवीचा जागर होणार आहे. त्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होते.
कल्याण खाडीनजीक दुर्गाडीदेवीच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी मराठा आरमाराची स्थापना केली होती. तेव्हापासून ठाकुर्लीनजीक चोळेगावात यात्रेची ऐतिहासिक परंपरा असल्याचे सांगितले जाते. शिवशाहीनंतर पेशवाई आली. पेशवाईचा अस्त १८१८ साली झाला. त्यानंतर, ब्रिटिशांची राजवट आली. ब्रिटिश राजवटीत गव्हर्नर हॅन्री बॅटले यांनी चोळेगावचे शेतकरी सटवाजी पाटील यांना गावदेवीची-ग्रामदेवतेची सनद कायमस्वरूपी दिली. सटवाजी पाटील यांचा मुलगा भाऊ पाटील यांनी पुढे कारभार पाहिला. त्यानंतर, शेतकरी हरी बाळू पाटील व काथोड बाळू पाटील तसेच शंगर गोमा, कचरू राघो, दामा पदू चौधरी यांना ही जमीन इनामी दिली. सटवाजी पाटील यांची आठवी पिढी सध्या देवीची सेवा करीत आहे. सटवाजी पाटील यांचे वंशज मधुकर पाटील हे आता देवीच्या संस्थानाचे काम पाहत आहे. मुकुंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. ग्रामस्थांनी दिलेल्या देणगीतून ३ मे २००२ रोजी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.
देवीची यात्रा दरवर्षी वैशाख पौर्णिमेला लागून येणाऱ्या सोमवार व मंगळवारी भरायची. त्यानंतर, यात्रा तीन वर्षांनी भरवण्याचा नियम केला गेला. आता दर तीन वर्षांनी वैशाख पौर्णिमेला दोन दिवसांची यात्रा भरते. चोळे, बारका चोळा, आताचा नवापाडा आणि खंबाळपाडा हा चोळेगावचा एक पाडा अशा तीन गावांची ही जत्रा असते. या गावच्या सासरी गेलेल्या लेकी यानिमित्त माहेरी येतात. उत्सवाला हजेरी लावतात. मधुकर पाटील यांची मुलगी अपर्णा ही तर अमेरिकेतून खास यात्रेसाठी येणार आहे. (प्रतिनिधी)