मुख्यमंत्री घेणार आज म्हाडाची झाडाझडती!
By Admin | Updated: May 7, 2015 05:44 IST2015-05-07T02:46:11+5:302015-05-07T05:44:53+5:30
गैरव्यवहार व बेकायदेशीर कृत्यामुळे वादग्रस्त बनलेल्या म्हाडाच्या कारभाराची दखल घेण्यासाठी अखेर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना एकदाचा मुहूर्त मिळाला आहे.

मुख्यमंत्री घेणार आज म्हाडाची झाडाझडती!
अधिकाऱ्यांची भंबेरी : सहा महिन्यांनंतर मिळाला भेटीचा मुहूर्त, घरांची सोडत पारदर्शक होण्यासाठी करणार सूचना
जमीर काझी, मुंबई
गैरव्यवहार व बेकायदेशीर कृत्यामुळे वादग्रस्त बनलेल्या म्हाडाच्या कारभाराची दखल घेण्यासाठी अखेर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना एकदाचा मुहूर्त मिळाला आहे. गुरुवारी ते प्राधिकरणाच्या प्रधान कार्यालयात येऊन कामकाजाचा आढावा, अधिकाऱ्यांची झाडाझडती घेणार आहेत. या महिन्याच्या अखेरीस होत असलेल्या घरांच्या सोडतीच्या पारदर्शकतेच्या अनुषंगाने त्यांना सूचना केल्या जाणार आहेत.
युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची म्हाडामध्ये पहिलीच भेट असल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. आज दिवसभर बैठकीत उपस्थित होणाऱ्या प्रश्नाच्या अनुषंगाने माहिती जमविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. फडणवीस सकाळी ११ वाजता म्हाडात येणार असून, सुमारे तासभर अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दलाल व एजंटांच्या विळख्यात सापडलेला म्हाडातील कारभार गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त राहिला आहे. विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांकडून लाच घेत असलेल्या विविध विभागांतील चौघा लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. युती सरकारकडून राज्याचे नवे गृहनिर्माण धोरण जाहीर केले जाणार आहे. इंग्रजीत व मराठीमध्ये ते बनविण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून गतीने सुरू होते.
गरजू नागरिकांना रास्त दरात हक्काचा निवारा मिळवून देणे, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची (म्हाडा) व्याप्ती राज्यभर आहे. मात्र नागरिकांना घर मिळवून देणे, तसेच जुन्या इमारतीची
पुर्नविकास योजना, ट्रान्झिस्टमध्ये नंबर लावण्याच्या आमिषाने दलालांनी लुबाडणूक केली आहे. म्हाडातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करून ‘रॅकेट’ कार्यरत असल्याचे अनेक प्रकरणांतून चव्हाट्यावर आले.
-------
दक्षता विभागाचा आढावा : गैरव्यवहाराला प्रतिबंधासाठी कार्यरत असलेल्या दक्षता विभागातील मुख्य दक्षता अधिकाऱ्यांचे पद तब्बल १६ महिने रिक्त होते. त्यामुळे विभागाकडे आलेल्या तक्रारी, अर्ज चौकशीविना प्रलंबित राहिले होते. गेल्या महिन्यात या ठिकाणी हेमंत नागराळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उद्याच्या बैठकीत मुख्यमंत्री दक्षता विभागातील कामकाजाच्या पद्धतीचा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले.